इनेस्टाचा फुटबॉलला रामराम
वृत्तसंस्था/ माद्रीद
स्पेनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू 40 वर्षीय आंद्रेयास इनेस्टाने मंगळवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. 2010 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेन संघामधील इनेस्टाने विजयी गोल केला होता.
इनेस्टाने आपल्या 22 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत स्पेनला दोनवेळा युरोपियन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद तसेच चारवेळा बार्सीलोना संघाला चॅम्पियनशीप लीगचे अजिंक्यपद मिळवून दिले. बार्सिलोना फुटबॉल क्लबमधील तो महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. 2018 साली त्याने बार्सिलोना क्लब सोडल्यानंतर तो जपानमधील व्हिसेल कोबे संघाकडून खेळत होता. गेल्या वर्षी त्याने संयुक्त अरब अमिरात प्रो लीग फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविला होता. 2002 साली त्याने बार्सिलोना क्लबमध्ये आपले पदार्पण केले. त्यानंतर तो या क्लबकडून 674 सामने खेळला आहे.