अँड्रीव्हा-साबालेंका अंतिम लढत
वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया
इंडियन वेल्स मास्टर्स 1000 दर्जाच्या बीएनपी पेरीबस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाची नवोदित मीरा अँड्रीव्हा आणि बेलारुसची टॉपसिडेड आर्यना साबालेंका यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली. अँड्रीव्हाने उपांत्य लढतीत पोलंडच्या विद्यमान विजेती स्वायटेकला पराभवचा धक्का दिला तर साबालेंकाने अमेरिकेच्या मॅडीसन कीजचे आव्हान संपुष्टात आणले.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या 17 वर्षीय मीरा अँड्रीव्हाने या स्पर्धेतील विद्यमान विजेती इगा स्वायटेकचा 7-6 (7-1), 1-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अँड्रीव्हाने गेल्याच महिन्यात दुबईतील टेनिस स्पर्धा जिंकली होती. आता ती डब्ल्युटीए टूरवरील 1000 दर्जाची दुसरी स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. या उपांत्य लढतीत दोन्ही खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला. पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबल्यानंतर अँड्रीव्हाने हा सेट 7-6 (7-1) असा जिंकून स्वायटेकवर आघाडी घेतली. अँड्रीव्हाने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. तर तिच्या वेगवान सर्व्हिसमुळे स्वायटेकला परतीचे फटके मारताना अवघड जात होते.दुसऱ्या सेटमध्ये स्वायटेकने आपल्या डावपेचात बदल केला आणि हा सेट 6-1 असा जिंकून अँड्रीव्हाशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये स्वायटेकला किमान दोनवेळा आपली सर्व्हिस गमवावी लागली. या सेटमध्ये स्वायटेकने तीन गेम्स जिंकले. अखेर फोरहॅन्ड फटक्यावर अँड्रीव्हाने विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात अँड्रीव्हाचा खेळ अधिक दर्जेदार आणि अचूक झाल्याने तिला हा सामना जिंकता आली, अशी प्रतिक्रिया स्वायटेकने व्यक्त केली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात बेलारुसच्या टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने अमेरिकेच्या मॅडिसन कीजचा 6-0, 6-1 अशा सरळ सेटमध्ये केवळ 52 मिनिटांत पराभव करत अंतिम फेरी गाठली. या लढतीतील पहिल्या सेटमध्ये साबालेंकाने कीजवर 5-1 अशी आघाडी मिळविली होती. मॅडिसन कीजला आपली सर्व्हिस राखता आली नाही. तसेच साबालेंकाच्या फटक्यातील विविधता असल्याने तिच्याकडून वारंवार चुका झाल्या. तीनवेळा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपद मिळविणारी साबालेंकाने 2023 साली या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.