अॅंड्रीव्हा, मॅडीसन कीजला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था / मियामी
येथे सुरू असलेल्या डब्ल्युटीए टूरवरील मियामी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेती मॅडीसन कीज तसेच इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजेती रशियाच्या नवोदित मीरा अँड्रीव्हा यांना अनुक्रमे अॅलेक्सेंड्रा इला आणि अॅनिसीमोव्हाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
महिला एकेरीच्या सामन्यात वाईल्ड कार्डधारक 19 वर्षीय इलाने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेत्या मॅडीसन कीजला 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत पुढील फेरीत प्रवेश मिळविला तर दुसऱ्या एका सामन्यात अमंदा अॅनिसीमोव्हाने मीरा अँड्रीव्हाचा 7-6 (7-5), 2-6, 6-3 असा पराभव केला. हा सामना जवळपास तीन तास चालला होता. अन्य एका सामन्यात पोलंडच्या टापसिडेड स्वायटेकने इलेसी मर्टन्सचे आव्हान 7-6 (7-2), 6-1 असे संपुष्टात आणत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले.
पुरुषांच्या विभागात सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचने विजयी सलामी देताना कॅमिलो केराबेलीचा 6-1, 7-6 (7-1) असा पराभव केला. एटीपी टूरवरील मास्टर्स स्पर्धेत जोकोविचने एक हजार सामने जिंकण्याचा नवा विक्रम केला आहे. अन्य एका सामन्यात नाकासीमाने गोफिनचा 6-3, 6-7 (5-7), 6-3, सेबेस्टियन कोर्दाने ग्रीसच्या सित्सिपसचा 7-6 (7-4), 6-3, बल्गेरीयाच्या डिमीट्रोव्हने कॅचेनोव्हचा 6-7 (3-7), 6-4, 7-5, फ्रान्सच्या मोनफिल्सने स्पेनच्या मुनारचा 7-5, 5-7, 7-6 (7-1) असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.