दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात 17 ठार !
वृत्तसंस्था / केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेतील लुजिकिसीकी या खेड्यात झालेल्या भीषण गोळीबारात 15 महिलांसह 17 सर्वसामान्य नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या देशाच्या पूर्व केप प्रांतात त्यामुळे भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या चौकशीस प्रारंभ करण्यात आला असून दहशतवादी हल्ल्याशी शक्यताही गृहित धरण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांमधील हा या देशातील सर्वात मोठा हला आहे. हल्लेखोरांना त्वरित शोधण्यासाठी व्यापक अभियान हाती घेण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली. दोन घरांमध्ये एका कार्यक्रमासाठी माणसे जमलेली असताना, हा गोळीबार करण्यात आला. या दोन घरांपैकी एका घरात 12 तर दुसऱ्या घरात 5 माणसे ठार झाली. स्थानिक पोलिसांनी हल्ल्याचे क्षेत्र प्रतिबंधित केले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिस दलांची नियुक्ती केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनेही हल्ल्यातील मृतांसाठी दु:ख व्यक्त केले आहे. हल्ल्याचा नेमका उद्देश अद्याप समजलेला नाही. स्थानिकांच्या साहाय्याने हल्लेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न होत आहेत, अशी माहिती देण्यात आली.