अन् पांडूतात्यांचा पुनर्जन्मच झाला !
कोल्हापूर / सचिन बरगे :
वेळ सोमवारी सायंकाळी सातची. वारकरी संप्रदायातील पांडूतात्या नेहमीप्रमाणे हरिनामाचा जप करत बसलेले. जप करताना अचानक तात्या बसल्या जागी जमिनीवर कोसळले. बाहेरच्या खोलीत कसला तरी आवाज आल्याने पत्नी बाळाबाई स्वयंपाकघरातून बाहेर आली, पाहते तर काय? घामाने भिजलेले तात्या जमिनीवर निपचिप पडलेले. हे दृश्य पाहून भयभीत झालेल्या बाळाबाईंनी मोठ्या आवाजात शेजाऱ्यांना हाक दिली. क्षणाचाही विलंब न करता तात्यांना गंगावेश येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बेशुद्धावस्थेत असलेल्या तात्यांची तब्येत बिघडत चालली होती. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अखेर रात्री साडेअकरा वाजता डॉक्टरांनी अनेक प्रयत्नांती पांडूतात्या गेल्याचे जाहीर केले. दरम्यान, अंत्यविधीची तयारी सुरू झाली, अन् तात्यांना अॅम्ब्युलन्समधून घरी आणताना रस्त्यात धक्का बसला अन् त्यांची हालचाल सुरू झाली, त्यांचे हृदय पुर्ववत सुरू झाल्याने पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल पेले, आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. पांडुतात्यांना मिळालेल्या या पुनर्जन्माची ही कहानी चर्चेत आहे.
पांडूतात्या म्हणजे कसबा बावड्यातील उलपे मळा येथील शेतमजूर पांडुरंग रामा उलपे. पांडूतात्या वयाच्या दहाव्या वर्षापासून वारकरी संप्रदायात. त्यामुळे तेव्हापासूनच ते वारकरी. 65 वर्षाचे पांडू तात्या दरवर्षी न चुकता पंढरपूरची कार्तिकी वारी करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील पांडू तात्या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना एकुलती एक मुलगी. तिचेही लग्न झाले आहे.
पांडुतात्यांना हृदयविकाराचा झटका आला, अन् ते जागीच कोसळले. पत्नी बाळाबाई यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना गंगावेशीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये रात्री उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक तपासणी करून पांडूतात्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या घरी पांडू तात्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. तात्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेजाऱ्यांनी त्यांच्या सर्व पाहुण्यांना कळवले. तोपर्यंत तात्यांची मुलगी व जावई हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचले. तात्यांच्या मृत्यूची बातमी पत्नी बाळाबाईला समजताच त्यांनी आक्रोश केला. अंतिम संस्कारासाठी रात्रीची वेळ असूनही पाहुण्यांनी तात्यांच्या घरी गर्दी केली होती. गावातील वारकरी मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मंडळांनी अत्यंविधीच्या साहित्यासह शववाहिकेलाही सांगून ठेवले होते. दरम्यान, पांडूतात्यांना हॉस्पिटलमधून घरी खासगी अॅम्ब्युलन्सने आणले जात होते. गाडीमध्ये तात्यांचे दोन नातेवाईक होते. यावेळी मार्गावरील सीपीआर चौकातील एका खड्ड्याचा तात्यांना घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला धक्का बसला. या धक्क्याने अचानक तात्यांची काहीशी हालचाल होत असल्याचे शेजारी बसलेल्या त्यांच्या नातेवाईकाला दिसले. अन् क्षणाचाही विलंब न करता अॅम्बुलन्स चालकाला गाडी सरळ डी. वाय. पाटील हॉस्पिटलला घ्यायला सांगितली.
तेथील डॉक्टरांनी सुद्धा तात्यांच्या जीवाची गॅरंटी दिली नाही. पण सर्व प्रयत्न पणाला लावून शेवटचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू झाले. डॉक्टरांच्या उपचाराला पांडू तात्यांनीही तसा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. मृत घोषित केलेले पांडूतात्या काही तासांत शुद्धीवर आले. हे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले. दरम्यान, अंतीम निरोपाच्या प्रतिक्षेत नातेवाईकांना मात्र रात्र जागून काढावी लागली. डॉक्टरांचे प्रयत्न अन् तात्यांची जगण्याची तीव्र इच्छा त्यातूनच गेल्या आठ दिवसांत तात्यांची प्रकृती सुधारली आहे. यासंदर्भात पांडुरंगाने केलेली पांडुरंगावरच कृपा.., यामुळे तात्या शुद्धीवर आल्याचे पत्नी बाळाबाई यांनी सांगितले. पांडूतात्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. जणू पांडूतात्यांचा पुनर्जन्मच झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.