महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अन् त्यांच्या चित्रकारीतेला मिळाले मोकळे अवकाश...!

11:58 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 दिलेश हजारे यांच्या सर्जनाचा समर्पित प्रवास : टॉप 80 पुरस्काराचे मानकरी

Advertisement

फोंडा : ‘कलेसाठी जीवन, की जीवनासाठी कला’ हा वाद सर्वश्रुत आहे...! चित्रकार दिलेश नारायण हजारे यांनाही हा प्रश्न पडला व चित्रकलेत आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी चांगल्या पगाराची नोकरीही सोडली व आज चित्रकार म्हणून ते मनसोक्त जीवन जगत आहेत. त्यांच्या सर्जनातून उतरलेली चित्रे आज जगभरातील कलाप्रेमींपर्यंत पोचली आहेत. मलेशिया इंटरनॅशनल ऑनलाईन ज्युरिड आर्ट कंपिटिशन या नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय पेटिंग स्पर्धेत त्यांच्या चित्राची नोंद झाली. सर्वोत्कृष्ट ऐंशी चित्रांमध्ये त्यांचे पेटिंग निवडले गेले. चित्रकार दिलेश हजारे हे मूळ फोंड्यातील केरी गावचे सुपुत्र. शालेय जीवनातच चित्रकलेची बिजे नकळत त्यांच्यात रुजली. केरीच्या सुरश्री केसरबाई केरकर विद्यालयात शिकत असताना कला शिक्षक सुदेश वझे यांनी त्यांच्यातील बालचित्रकार हेरला व त्याला कलेची दृष्टी दिली. विद्यार्थीदशेत बऱ्याच चित्रकारिता स्पर्धांमधून त्यांनी चमक दाखवली. इयत्ता आठवीत शिकत असताना जपानमध्ये झालेल्या इंडो जापनीस असोसिएशनच्या चित्रकला स्पर्धेसाठी दिलेश यांचे पेंन्टिग निवडले गेले.  लँडस्केप पद्धतीने चितारलेल्या या पेंटिगने चित्रकार म्हणून त्यांची पुढील दिशा तेव्हाच निश्चित केली होती.

Advertisement

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर चित्रकलेमध्येच भवितव्य घडविण्याचा निर्णय घेऊन त्यांनी गोवा कला महाविद्यालयाचा रस्ता धरला. पदवीपर्यंत पाच वर्षांच्या कॉलेज जीवनात आतंर महाविद्यालयीन व अन्य राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या कलेचा वेळोवेळी ठसा उमटविला. पदवी मिळाल्यानंतर सिडेक पुणे या नामांकीत संस्थेमध्ये ‘टू डी व थ्री डी अॅनिमेशन’ हा अभ्यासक्रम पूर्ण करुन मोठ्या संधीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. धोबीतलाव येथील पिनेकल या व्यावसायिक स्टुडिओमध्ये काहीकाळ जाहिरात व फिल्मसाठी थ्रीडी अॅनिमेशनचे काम केले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडून त्यांना गोव्यात परतावे लागले. जीवनाच्या एका निर्णायक टप्प्यावर पूर्णवेळ चित्रकारीता कऊन गोव्यासारख्या राज्यात गुजारणा करणे शक्य नव्हते. त्यामुळे उरी बाळगलेल्या स्वप्नांना आवर घालीत कला शिक्षक म्हणून त्यांना नोकरी पत्करावी लागली. वास्को येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये 21 वर्षे त्यांनी कला शिक्षक म्हणून घालविली. पण मनाची घुस्मट काही थांबत नव्हती. एकाबाजूला शाळा तर दुसरीकडे हाती असलेल्या वेळेत पेंन्टिगचे काम सुरुच होते. शेवटी एक दिवस स्वेच्छानिवृत्ती घेऊन उर्वरीत जीवन कलाकार म्हणून मुक्तपणे जगण्याचा निर्णय घेतला. चित्रकलेचे मोकळे अवकाश त्यांना खुणावत असल्याने एका चौकटीत अडकून त्यांना राहायचे नव्हते. येथून खऱ्या अर्थाने मुक्त चित्रकार म्हणून त्यांचा प्रवास सुऊ झाला.

भारतातील पहिले थ्रीडी फोटोग्राफी प्रदर्शन

दिलेश हजारे यांनी आपल्या चित्रकारी प्रवासात बहुतेक प्रकार हाताळले. पोट्रेट, अॅब्स्ट्रेक्ट पेंटिंग, एक्रेलीक पद्धतीचे लँडस्केप, चारकोल या प्रकारातून त्यांनी आपल्या सर्जनशिलतेला मुक्त वाव दिला. त्यांनी वैयक्तिक व सामूहिक अशा अनेक प्रदर्शनातून आपली पेंटिंग्स सादर केली आहेत. वॉटर कलरमधून लँडस्केप या प्रकारात ‘गोवा ग्लोरी’ चारकोलमध्ये ‘पुरुषार्थ’ या विषयावर न्यूड पेंटिंग्स तसेच  ललित कलाअकादमी दिल्ली येथे ‘मच्छा’ या संकल्पनेवर ऐक्रेलीक पेटिंग्सचे प्रदर्शन  लावले आहे. गोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘आभास’ हे थ्रीडी प्रदर्शन सन 2018 मध्ये खास आग्रहास्तव दुसऱ्यांदा लावण्यात आले होते. मुळात 2006 मध्ये पणजी येथे झालेले त्यांचे हेच थ्रीडी फोटोग्राफी प्रदर्शन भारतातील अशाप्रकारचे पहिले प्रदर्शन म्हणून नोंद झाले आहे.

अन् चित्रकारीतेला मिळाले मोकळे अवकाश

नोकरीतून मुक्त झाल्यामुळे त्यांच्या चित्रकारीतेला खऱ्या अर्थाने मोकळे अवकाश मिळाल्याचे ते सांगतात. लहर आली की ते आपले ब्रश-पेंट साहित्य घेऊन थेट हंम्पिला जातात. या ऐतिहासिक स्थळावर बसून मुक्तपणे आपल्या प्रतिभेची उधळण  रंगाविष्कारातून करतात. दिलेश हजारे यांची आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर तब्बल अठरा प्रदर्शने झाली आहेत. गोव्यासह पुणे, मुंबई व दिल्लीमध्ये ही प्रदर्शने भरविण्यात आली असून बॉम्बे आर्ट सोसायटी, इंडियन आर्ट फेस्टीव्हल, राजा परांजपे पुणे या नामांकित संस्था व महोत्सवात त्यांच्या पेंटिंग्सना मानाची जागा मिळाली आहे. याशिवाय आतंरराष्ट्रीय पातळीवर जर्मनी, टर्की, अमेरिका, बांगलादेश, इराण, पोलंड, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम आदी देशातील चित्रकारीता महोत्सवात ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या कलाकृती जगभरातील कलाप्रेमीपर्यंत पोहोचल्या आहेत.

मलेशियातील ‘टॉप 80 पेटिंग पुरस्कार’

हल्लीच मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पेंटिंग स्पर्धेत ‘टॉप 80 पेंटिंग’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. जगभरातील 60 राष्ट्रातून 1227 चित्रकारांनी आपल्या कलाकृती या स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या. त्यापैकी सर्वोत्कृष्ट 80 पेंटिंग्समध्ये दिलेश हजारे यांचे पेंटिंग निवडले गेले. हा पुरस्कार म्हणजे आपल्या चित्रकारीतेचा सन्मान आहे. आयुष्यात येणारे असे क्षण मुक्त चित्रकार म्हणून आपण घेतलेला ध्यास शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवण्याची कायम उर्जा देत राहणार आहेत, असे त्यांना वाटते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article