बगीच्यात मिळाले प्राचीन दात
सध्या ज्या ठिकाणी तुमचे शेत किंवा बगीचा आहे, तेथे कधीकाळी जंगल राहिले असेल. जेथे जंगल राहिले असेल, तेथे वन्यप्राण्यांचे वास्तव्य राहिले असणार आहे. काही वन्यप्राणी आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहे, परंतु काही विलुप्त झाले आहेत. जे विलुप्त झाले आहेत, त्यांचे अवशेष मिळत राहतात. हे अवशेषच त्यांच्या विषयी अधिक माहिती देण्याचे काम करतात.
अलिकडेच अमेरिकेत एका दांपत्याला स्वत:च्या बगीच्यात काम करताना कुठल्या तरी जीवाचे दात मिळाले आहेत. जेव्हा त्यांनी हे दात तपासणीसाठी दिले असता वैज्ञानिकांनी मिळालेली माहिती चकित करणारी ठरली आहे.
न्यूयॉर्कच्या एका दांपत्याला स्वत:च्या बगीच्यात काही दात मिळाले. या दांपत्याने स्वत:ची ओळख गोपनीय ठेवत या घटनेविषयी माहिती दिली आहे. जेव्हा ती बगीच्यात बागकाम करत होते, तेव्हा त्यांना अत्यंत मोठ्या आकाराचे दात जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी त्वरित तज्ञांना बोलावत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
13 हजार वर्षांपूर्वीच्या जीवाचे दात
तपासणीत हे दात प्रत्यक्षात विशाल मॅस्टोडॉनचे होते, हा प्राणी हत्तींचा पूर्वज होता आणि मॅमथची साधर्म्य असणारी प्रजाती होती असे समोर आले. हा जीव या पृथ्वीवर 13 हजार वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात होता. या शोधामुळे न्यूयॉर्कच्या इतिहासाविषयी बरेच काही कळले आहे. मेस्टोडॉनच्या या जबड्यामुळे याच्या प्रजातीच्या जीवांविषयी अधिक माहिती प्राप्त करण्याची संधी हाती लागल्याचे उद्गार न्यूयॉर्क स्टेट म्युझियमचे डायरेक्टर ऑफ रिसर्च अँड कलेक्शन, रॉबर्ट फर्नेस यांनी काढले आहेत.
वैज्ञानिकांकडून जबड्याची तपासणी
या जबड्याच्या संशोधनानतून शीतयुगाविषयी वैज्ञानिकांना महत्त्वाची माहिती मिळणार आहे. जबड्यासमवेत वैज्ञानिकांना हाडं, अंगठ्याचे हाड देखील सापडले आहे. आता कार्बन डेटिंगद्वारे त्यांच्याविषयी अधिक माहिती प्राप्त केली जाणार आहे. हे एखाद्या प्रौढ मेस्टोडॉनच्या जबड्याचे अवशेष असल्याचे संशोधकांचे मानणे आहे. आता हे अवशेष किती जुने आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न टीम करणार आहे. चालू वर्षात हे अवशेष संग्रहालयात पाहता येणार आहेत.