खोल समुद्रात मिळाले प्राचीन जीवाश्म
1,40,000 वर्षे जुना इतिहास आला समोर
खोल समुद्रात अनेक रहस्यं दडलेली असून त्याविषयी फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही. इंडोनेशियाच्या समुद्रात अनेक फूट खोलवर एक असाच रहस्यमय इतिहास मिळाला आहे. इंडोनेशियानजीक लागलेल्या या शोधाने दक्षिणपूर्व आशियात मानवी इतिहासावरून आतापर्यंतच्या अनेक धोरणांना आव्हान दिले आहे. जावा आणि मदुरा बेटांदरम्यान सागरी क्षेत्रात वैज्ञानिकांना एक असा पुरावा मिळाला आहे, जो हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात पृथ्वीवरील एक हिस्सा ‘सुंडालँड’ आणि तेथील प्राचीन मानवी जीवनाशी निगडित असू शकतो. हे क्षेत्र आज भले समुद्रात बुडालेले असले तरी कधीकाळी ते मानवी जीवनाचा भाग होते.
समुद्रात लपले आहे रहस्य
पूर्व जावानजीक मदुरा सामुद्रधुनीत सागरी वाळू बाहेर काढण्याचे काम सुरू असताना हा शोध लागला होता. त्यावेळी कामगारांना मोठ्या प्रमाणात फॉसिल्स मिळू लागले. या जीवाश्मांमध्ये 6000 हून अधिक सांगाडे सामील होते. यात कोमोडो ड्रॅगन, हरिण आणि स्टेगोडॉन नावाच्या विशालकार हत्तीसारख्या प्राण्यांचे अवशेषही होते. सर्वात चकित करणारी बाब म्हणजे यात मानवी कवटींचे तुकडेही हेते.
मानवी कवटींमुळे रहस्य
या कवटींच्या तुकड्यांची रचना लक्ष वेधून घेणारी ठरली. नेदरलँडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लीडनच्या पुरातत्वतज्ञ हॅरॉल्ड बर्गहुइस आणि त्यांच्या टीमने विस्तृत तपासणी केली. तपासणीत हे तुकडे होमो इरेक्टस नावाच्या प्राचीन मानवी प्रजातीचे असल्याचे कळले. या प्रजातीला आधुनिक माणसांचे पूर्वज मानले जाते. या हाडांना समुद्रात वाळू आणि सिल्टमध्ये सुमारे 1.4 लाख वर्षांपर्यत दाबून राहिल्यावर बाहेर काढण्यात आले आहे.
कधीकाळी होती वस्ती
वैज्ञानिकांनी ऑप्टिकली स्टिम्युलेटेड ल्यूमिनेसेंस नावाच्या या तंत्रज्ञानाद्वारे या अवशेषांचे वय शोधून काढले. यातून हा भाग कधीकाळी एका विशाल नदीचे खोरे होते, जे जुन्या ‘सोलो नदी व्यवस्थे’चा हिस्सा राहिले असावे असे स्पष्ट झाले. तेथे आढळून आलेल्या प्राण्यांच्या आणि अवशेषांमधून हा भाग कधीकाळी दाट वनसंपदा आणि प्राण्यांनी भरलेला होता हे स्पष्ट आहे. अनेक प्राण्यांच्या हाडांवर चावण्याच्या खुणा आढळून आले आहेत. यातून होमो इरेक्टस लोक शिकार करण्यासह प्राण्यांना कापत होते आणि मांस मिळविण्यासाठी अवजारांचा वापर करत होते असे समजते.
हजारो वर्षांपूर्वी समुद्रात सामावले
सुंडालँड जे आता समुद्रात बुडाले आहे, ते एकेकाळी मोठा भूभाग होता, जो दक्षिणपूर्व आशियाच्या अनेक हिस्स्यांना जोडत होता. सुमारे 14000 ते 7000 वर्षांपूर्वी समुद्राची पातळी 120 मीटरपर्यंत वाढली, यामुळे हे क्षेत्र पाण्यात बुडाल्याचे वैज्ञानिक मानतात. हा शोध योगायोगाने लागला असला तरीही तो आता मानव विकासाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरला आहे. या रहस्याने मानवी इतिहासाची मूळं खोलवर असल्याचे दाखवून दिले आहे.