प्राचीन इंजिनियरिंगचा चमत्कार ‘विंड टॉवर’
लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही तंत्रज्ञान
इराणचे वाळवंटी शहर यज्दमध्ये शतकांपेक्षा जुन्या इमारती आणि घरांवर चिमणीसारखे मिनार दिसून येतात, ज्यांना पर्शियन विंड टॉवर, विंडकॅचर, विंड स्कूप या नावांनी ओळखले जाते. प्रत्यक्षात अशाप्रकारचे टॉवर या प्राचीन शहरात विकसित करण्यात आलेल्या इंजिनियरिंग चमत्कारांपैकी एक आहेत. याचे तंत्रज्ञान येथील लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
पर्शियन विंड टॉवर हे एकप्रकारचे एअर कंडिशनर असून ते विजेशिवाय वातावरण 12 अंश सेल्सिअसपर्यंत थंड करू शकते. हा टॉवर एक प्रकारे ग्रीन एअर कंडिशनरप्रमाणे काम करतो, याचा शोध अनेक वर्षांपूर्वी लागला होता. यज्द शहरात भीषण उष्णता असते आणि तेथे दिवसा तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असते. अशा स्थितीत इमारतींवर लावण्यात आलेले विंडकॅचर लोकांना थंड हवा पुरवत होते. यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळत होता. विंडकॅचर टॉवरला पर्शियन भाषेत बदगीर म्हटले जाते.
कार्य स्वरुप
विंड कॅचरमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान अत्यंत अद्भूत आहे. याची निर्मिती भीषण उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून करण्यात आली होती. विंडकॅचर टॉवर सर्वसाधारणपणे दोन किंवा दोनहून अधिक खुल्या काठांच्या एका लांब चिमणीप्रमाणे दिसतो, या टॉवरच्या एका खुल्या हिस्स्यातून हवा आत येते. तर दुसऱ्या खुल्या हिस्स्यातून तप्त हवा बाहेर फेकली जाते. कधीकधी या टॉवर्समध्ये संकीर्ण नाले तयार केले जातात, याच्या संपर्कात आल्याने हवा आणखी थंड होते, यामुळे इमारतीतील वातावरण थंड होत असते.
अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान
विंडकॅचर टॉवर्सचे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, कारण ही विजेशिवाय, तसेच महागड्या एअर कंडिशनरशिवाय नैसर्गिक स्वरुपात थंड हवा उपलब्ध करवित असते. यामुळे प्रदूषण देखील होत नाही. हे तंत्रज्ञान भारतात देखील उपयुक्त ठरू शकते.