जलाशय आटल्याने मिळाले पुरातन शहर
इराकमधील हवामान बदलाचा सुखद परिणाम
इराकमध्ये हवामान बदलामुळे भीषण उष्णतेला लोकांना तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या तापमानामुळे मोसुल जलाशय आटला आहे, यामुळे पाण्याखाली लपलेले एक प्राचीन शहर सर्वांसमोर आले आहे. 3,400 वर्षे जुन्या शहराचा शोध निसर्गाच्या एका विनाशकारी स्वरुपामुळे लागला आहे.
इराकचे हे प्राचीन शहर कधीकाळी उत्तर मेसोपोटामियाच्या एका इंडो-इराणी साम्राज्यात टिग्रिस नदीच्या काठावर होते. इराक सध्या भीषण दुष्काळाला सामोरा जात असल्याने देशातील सर्वात मोठा जलाशय पूर्णपणे आटला आहे. कुर्द आणि जर्मन संशोधकांच्या एका पथकाने या शहराचा शोध लावला आहे.
ख्रिस्तपूर्व 1350 मध्ये हे शहर नष्ट झाले होते असे आतापर्यंत मानले जात होते. याचमुळे हा शोध अधिकच थक्क करणारा आहे. शहराचे उत्खनन करताना पुरातत्व तज्ञांनी एक महाल आणि अनेक विशालकाय आकाराच्या इमारतींचा शोध लावला आहे. यातील अनेक इमारती बहुमजली आहेत. त्यांचा वापर बहुधा भांडार आणि उद्योगधंद्यांसाठी केला जात असावा. या शहराच्या भिंती अद्याप संरक्षित असल्याने संशोधक चकित झाले आहेत. शहरामध्ये इमारतींच्या भिंती या मातीने तयार केलेल्या असून अनेक वर्षांपर्यंत पाण्यात बुडालेले असतानाही त्या अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. शहरात चिनी मातीची भांडी मिळाली आहेत. या शहरासंबंधी संशोधन अद्याप सुरू असल्याने पुढील काळात आणखीन नव्या गोष्टी यातून समोर येणार असल्याचे मानले जात आहे.