आंचिमची तयारी अंतिम टप्प्याकडे...
पणजी : गोव्यात 20 ते 28 दरम्यान होत असलेला 54व्याभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी) काही दिवसांवर येऊन ठेपला असून महोत्सवाच्या तयारीला वेग येत असून अंतिम टप्प्याकडे आली आहे. तयारी वेगाने होत असली तरी महोत्सवाचे उद्घाटन कोण करणार यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही. महोत्सवासाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी तसेच पाहुण्यांना महोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी नवनवीन संकल्पनाची साधनसुविधा उभारली जात आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी आणि गोवा सरकारची गोवा मनोरंजन संस्था मिळून इफ्फीचे आयोजन करत आहे.
आंचिमसाठी रंगरंगोटी तसेच आयनॉक्स परिसरात टेन्ट उभारणे, गोवा मनोरंजन सोसायटी आवारात प्रतिनिधींना महोत्सवादरम्यान वेळ व्यतित करण्यासाठी बॅन्च आणि विशिष्ट प्रकारची आसनव्यवस्था केली जात आहे. याशिवाय या परिसरात विविध आकर्षक पद्धतीच्या चित्रपट, सिनेतारकांच्या आधारित सजावट दिसेल. सध्या कामगारांकडून विविध प्रकारच्या आकृत्या तयार करण्याचे व टेन्ट उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. प्रवेशद्वाराच्या सजावटीसाठी विविध कलाकृती तयार केल्या जात आहेत. महोत्सवातील महत्त्वाची ठिकाणे सजावटीकरिता एनआयडी अहमदाबाद या कंपनीसोबत करार केला आहे. यंदाचा इफ्फी भव्य आणि आकर्षक बनविण्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे.
यंदाच्या आंचिममध्ये सिनेमेळा हा प्रकल्प आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. यात एकाच छताखाली मनोरंजन, खाद्यपदार्थ याचा अनुभव स्थानिकांना घेता येणार आहे. परंतु सिनेमेळा नेमका काय आहे आणि कसा असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच रसिकांमध्ये निर्माण झाली असेल. याशिवाय ओपन एअर सक्रिनिंग, कारवां, शिगमोत्सव, गोवा कार्निव्हल, सेल्फी पॉइंट्स, इफ्फी मर्चंडाईज हे या महोत्सवाची इतर आकर्षणे असतील. दिव्यांगांना महोत्सव प्रवेशयोग्य व्हावा यासाठीही ठिकठिकाणी रॅम्पसारख्या विशिष्ट प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. विशेष दिव्यांग प्रतिनिधींना सर्व चित्रपट प्रदर्शन ठिकाणी आणि इतर ठिकाणी सहज प्रवेश करता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सुविधा असतील. हा महोत्सव सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि सुगम बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.