अनन्या पांडेची पॉडकास्टच्या जगतात एंट्री
मानसिक आरोग्यावर करणार संभाषण
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा ‘सीटीआरएल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता अभिनेत्रीने पॉडकास्टच्या जगतात प्रवेश केला आहे. अनन्या स्वत:च्या ‘सो पॉझिटिव्ह पॉडकास्ट’मध्ये आरोग्यदायी ऑनलाइन सवयींना प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मकतेशी निगडित संभाषण करणार आहे. पॉडकास्ट सीरिजचा उद्देश डिजिटल युगात मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणे आहे.
अनन्या पांडे सीरिजमध्ये प्राजक्ता कोळी, सुमुखी सुरेश, यशराज मुखाटे, अंकुश बहुगुणा आणि बेयूनिक यासारख्या कलाकारांसोबत मानसिक आरोग्य आणि सोशल मीडियाविषयी चर्चा करताना दिसून येणार आहे.
सध्याच्या डिजिटल युगात आमचे आयुष्य सोशल मीडियाशी इतके जोडले गेले आहे की जेथे ते अनेक सकारात्मकतेसह येते, तर अनेक आव्हानेही निर्माण करते. सो पॉझिटिव्ह पॉडकास्टद्वारे आम्ही सर्व एक पाऊल मागे घेत स्वत:च्या ऑनलाइन सवयींवर विचार करू शकतो आणि स्वत:च्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊ शकतो असे उद्गार अनन्याने काढले आहेत.
प्रत्येक एपिसोडमध्ये क्रिएटर्ससोबत चर्चा आणि वैयक्तिक कहाण्या असणार आहेत. श्रोत्यांना सध्याच्या हायपरकनेक्टेड जगात मानसिक संतुलना राखण्यासाठी रणनीति प्रदान करत येणार असल्याचे अनन्याने म्हटले आहे.