अनन्या, दिव्यांशीला सुवर्णपदक
वृत्तसंस्था / स्कोपेजी (मॅसेडोणीया)
येथे सुरू असलेल्या विश्व युवा टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या अनन्या मुरलीधरन आणि दिव्यांशी भौमिक यांनी 15 वर्षांखालील मुलींच्या गटात दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविताना अंतिम सामन्यात चीनच्या जोडीचा पराभव केला.
अनन्या आणि दिव्यांशी या भारतीय जोडीने दुहेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या झाओ वेंगक्यी आणि लियु झिलींग यांचा 11-8, 7-11, 11-8, 6-11, 14-12 अशा 3-2 गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलींच्या दुहेरीतील उपांत्य सामन्यात अनन्या आणि दिव्यांशी यांनी भारताच्या रैना आणि अंकोलिका चक्रवर्ती यांचा 3-1 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. सदर स्पर्धेमध्ये भारताच्या रैना भूता आणि अंकोलिका चक्रवर्ती यांनी कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये मुलांच्या 19 वर्षीय आणि 15 वर्षीय वयोगटात एकेरीमध्ये भारताच्या अभिनंद आणि रित्विक गुप्ता यांनी रौप्य पदके मिळविली. 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या शुनतोने अभिनंदचा 11-6, 11-7, 11-8 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले. अभिनंदला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 15 वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या सेंगसूने भारताच्या रित्विकचा 11-8, 11-5, 11-8 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले. रित्विकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये भारतीय टेबलटेनिसपटूंनी आतापर्यंत सहा पदकांची कमाई केली आहे.