अनंतकुमार हेगडे यांनी स्वत:हून बाजूला व्हावे
खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करावेत
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी कारवार मतदारसंघाचे सहावेळा नेतृत्व केले आहे. मात्र संपूर्ण मतदारसंघात कोणतीही विकासकामे अथवा औद्योगिक प्रकल्प आणलेला नाही. तसेच खानापूर तालुक्यातून कायमच त्यांना मोठ्याप्रमाणात मताधिक्य मिळत आले आहे. याचा विचार करून त्यांनी आपणहून राजकारणातून बाजूला व्हावे, आणि खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी, असे मत खानापूर तालुका भाजपचे कार्यकर्ते जयंत तिनेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले, अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. गेल्या 25 वर्षांत खानापूर तालुक्यासाठी कोणताच विकास केलेला नाही.
खानापूर तालुक्यात औद्योगिक विकासासाठी अनेक विकल्प असतानादेखील अनंतकुमार हेगडे यांनी याबाबत कोणताच गांभीर्याने विचार केलेला नाही. वेळोवेळी ते कायम आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत खानापूर तालुक्यात येण्याचे टाळत आहेत. जर त्यांची प्रकृती स्वास्थ्य ठिक नसेल तर त्यांनी स्वत:हून राजकारणातून बाजूला व्हावे, आणि खानापूर तालुक्यातील एखाद्या भाजप सक्रिय कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा आग्रह धरावा, व त्याला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनीच स्वीकारावी. निवडणुका जवळ आल्या की, प्रक्षोभक व्यक्तव करून स्टंटबाजी करून निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कायमच असे प्रयोग केले जातात. मात्र या वेळेला हा त्यांचा हातखंडा कामी येणार नाही. खानापूर तालुक्यातील मतदारांनी अनंतकुमार हेगडे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी दिल्ली आणि बेंगळूर येथील भाजप कार्यालयात पत्रे लिहावीत. आणि खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करावी, असेही ते म्हणाले.