आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव नाल्याचा नागरिकांना फटका
पावसाने घाण साचून दुर्गंधीचे साम्राज्य
वार्ताहर/येळ्ळूर
गेल्या वर्षभरापासून अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील नाल्याचा फटका नागरिकांना बसत असून पडलेल्या पावसाने घाण साचून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यातील घाण व दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील विहिरीतून पाझरत असल्याने विहिरींचे पाणी खराब झाले आहे. साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रणच मिळत आहे. नाल्यातील साचलेली घाण व कचरा काढून नाला साफ करावा व नागरिकांना दिलासा द्यावा. या नाल्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
नाल्यात सतत ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, हिवतापसारख्या रोगांनी डोके वर काढण्याच्या शक्यतेमुळे नागरिक भीतीखाली वावरत आहेत. हा नाला आनंदनगर तिसरा, दुसरा व पहिला क्रॉस असा नागरीवस्तीतून वाहतो आहे. नाला उघडा असून चुकून जरी लहान मुले अथवा जनावरे नाल्यात पडली तर मोठा अनर्थ घडण्याच्या शक्यतेमुळे महानगरपालिकेने यावर स्लॅब घालावा व धोका टाळावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.