स्क्वॅश स्पर्धेत अनाहत सिंग विजेती
वृत्तसंस्था/ इंदोर
एसआरएफआय इंडियन खुल्या 2025 च्या पीएसए चॅलेंजर महिलांच्या स्क्वॅश स्पर्धेचे अजिंक्यपद अनाहत सिंगने जिंकताना आपल्या देशाच्या अनुभवी जोश्ना चिन्नाप्पाचा पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची टॉप सिडेड महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने जोश्ना चिन्नाप्पाचा 3-2 (11-8, 11-13, 11-9, 6-11, 11-9) अशा गेम्समध्ये फडशा पाडत जेतेपद मिळविले. हा अंतिम सामना 54 मिनिटे चालला होता. 39 वर्षीय जोश्ना चिन्नाप्पाने यापूर्वी दोन वेळा आशियाई स्क्वॅश स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. पण तिला या अंतिम सामन्यात पहिला गेम गमवावा लागला. त्यानंतर जोश्नाने दुसरा गेम जिंकून अनाहत सिंगशी बरोबरी साधली पण तिसऱ्या गेममध्ये पुन्हा अनाहत सिंगने आघाडी घेतली. चौथा गेम जिंकून चिन्नाप्पाने बरोबरी साधली. पाचव्या आणि निर्णायक गेममध्ये अनाहत सिंगने अखेर चिन्नाप्पाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत जोश्ना चिन्नाप्पाने इजिप्तच्या द्वितीय मानांकित नेडियन इलामेमीचा 3-1 अशा गेम्समध्ये पराभव करत तर अनाहत सिंगने आयर्लंडच्या हेना क्रेगचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.