अभूतपूर्व भव्य दिव्य उद्घाटन
33 व्या ऑलिम्पिक खेळांचा पॅरिसमधील नेत्रदीपक सोहळ्याने शुभारंभ
वृत्तसंस्था/ पॅरिस
33 व्या ऑलिम्पिक खेळांचा नेत्रदीपक उद्घाटन सोहळा शुक्रवारी फ्रान्सच्या राजधानीत ‘न भूतो’ अशा पद्धतीने पार पडला. सारे पॅरिस शहर यानिमित्ताने एक प्रचंड अॅम्फीथिएटर बनले होते आणि फ्रान्सने त्यातून आपली सांस्कृतिक विविधता, क्रांतीची भावना, निर्दोष कारागिरी आणि वास्तुशिल्प वारसा प्रदर्शित केला. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच विविध देशांच्या पथकांचे संचलन स्टेडियममध्ये न होता नदीतून झाले. विख्यात नदी सीनने क्रीडापटूंच्या परेडसाठी एखाद्या ‘ट्रॅक’चे स्वरुप घेतले. पावसाने हजेरी लावूनही खेळाडू वा प्रेक्षकांचा तसेच कलकारांचा हिरेमोड झाला नाही.
या सोहळ्याची सुऊवात परंपरेला तोडून ‘परेड ऑफ नेशन्स’ने झाली, ज्यामध्ये 205 देशांचे खेळाडू आणि एका निर्वासित संघाने भाग घेतला. मुसळधार पाऊस आल्याने समारंभावर पाणी पडणार की काय असे वाटले होते. पण असे असूनही नौकांमध्ये स्वार होऊन खेळाडू उत्साहाने संचलनात सहभागी झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 16 दिवस चालणार असलेल्या स्पर्धांची औपचारिक सुऊवात करून खेळ सुरू झाल्याचे घोषित केले.
चार तास चाललेल्या समारंभात शेवटपर्यंत कोण ज्योत प्रज्वलित करणार हे गुप्त ठेवण्यात आले होते. खेळांच्या पुरुष-स्त्राr समानतेच्या संदेशास धरून फ्रेंच ज्युदोपटू महान टेडी रिनर आणि स्प्रिंट लिजंड मेरी-जोस पेरेक यांनी संयुक्तपणे ऑलिम्पिक ज्योत पेटवली. सदर ज्योत एका महाकाय ‘हॉट-एअर‘ फुग्याला जोडलेली होती. सदर फुगा त्यानंतर रात्रीच्या वेळी पॅरिसच्या आकाशात उडाला.
त्याआधी फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदानने स्पॅनिश टेनिस सुपरस्टार राफेल नदाल याच्याकडे मशाल सुपूर्द केली. नदालने मग आणखी एक टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्स आणि माजी ट्रॅक स्टार कार्ल लुईस यांच्यासह मशाल घेऊन सीन नदीतून प्रवास केला. 100 वर्षे वयाचे आणि सर्वांत जुने फ्रेंच ऑलिम्पिक चॅम्पियन चार्ल्स कॉस्टे हे व्हीलचेअरवरून आले होते. त्यांनी मशाल स्वीकारण्यापूर्वी डझनभराहून अधिक माजी फ्रेंच महान खेळाडूंनी ती स्वीकारली. कॉस्टे यांनीच मशाल रिनर आणि पेरेक यांच्याकडे सुपूर्द केली.