दवंडी देण्यासह गावच्या स्वच्छतेसाठी झटणारे काका
विठ्ठल कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम
वार्ताहर/किणये
ग्रामीण भागात एखादी माहिती, सूचना देण्यासाठी दवंडी पिटण्यात येते. आजही काही गावांमध्ये ही परंपरा जपली जात आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बिजगर्णी गावातील विठ्ठल कांबळे हे वर्षभरापासून गावात दवंडी देण्यासह रोज गावातील विविध मंदिर परिसरांची स्वच्छता करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे पश्चिम भागात सध्या कौतुक होत आहे. गावात साजरे करण्यात येणारे सणवार, गावातील विविध देवदेवतांची पूजा, वार पाळणूक, महत्त्वाची गावकऱ्यांची बैठक याबाबत बिजगर्णी गावातील सत्तर वर्षाचे विठ्ठल कांबळे हे रोज सकाळी सहा वाजता दवंडी पिटतात.
दवंडी दिल्यानंतर ते गावातील ब्रह्मलिंग मंदिर, कलमेश्वर मंदिर व अन्य मंदिर परिसराची स्वच्छता करतात. अगदी प्रामाणिक आणि नित्यनेमाने ते मंदिर परिसराची स्वच्छता करतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी स्वच्छता मोहीम हाती घ्यायला पाहिजे. आपल्या घरची व परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच गावच्या स्वच्छतेकडेही सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. त्यासाठीच आपण हे कार्य रोज करीत असतो, असे विठ्ठल कांबळे काका आवर्जून सांगतात. ग्रामस्थ, पंचकमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर व इतर सदस्यांनी त्यांचा विशेष गौरव केला आहे. गावागावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी विठ्ठल कांबळे हे इतरांसाठी एक आदर्शवत ठरत आहेत, असे गावकऱ्यांनी सांगितले.