मुंग्यांची सेवा करणारी संस्था
गुजरातमधील जहू माता सेवक परिवार ही संस्था मूक प्राण्यांचे संगोपन करण्यासाटी प्रसिद्ध आहे. केवळ इतकेच नाही, तर ही संस्था मुंग्यांचेही भरणपोषण करते. विविध प्रकारच्या मुंग्यांना या संस्थेच्या परिसरात संरक्षण मिळते. मुंग्यांसाठी वारुळे अणि घरेही निर्माण केली जातात. याकामी या संस्थेला पंचक्रोशीतील लोकांचे स्वयंस्फूर्त सहकार्य मिळते. विशेषत: गावांमधील महिला या कामी पुढाकार घेताना दिसतात. या कामातून सामाजिक सहकार्याचा आणि सौदार्हाचा संदेश दिला जातो, असे या संस्थेच्या चालकांचे प्रतिपादन आहे. ही संस्था अनेक दशकांपासून हे मूक जीवांच्या हितरक्षणाचे कार्य करीत असून या संस्थेने समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. या संस्थेला आर्थिक सहकार्यही उदार लोकांकडून होते.
आसपासच्या गावांमधील घरांमधून संस्थेला धान्याचा आणि इतर सामग्रीचा पुरवठा केला जाते. मूक प्राण्यांना आणि मुंग्यांसारख्या सूक्ष्म जीवांनाही अन्नाची त्रुटी जाणवू नये, ही भावना केवळ या संस्थेच्या चालकांचीच नाही, तर सर्वसामान्यांचीही आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे यथाशक्ती सहाय्य केले जाते.
आपल्याला नगण्य वाटणारे सूक्ष्म जीवही निसर्गाच्या जीवनसाखळीत महत्वाची भूमिका साकारत असतात. अशा जीवांची संख्या रोडावली किंवा ते नामशेष झाले तर पर्यावरणाची कधीही न भरुन निघणारी हानी होऊ शकते. अंतिमत: मानवही निसर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास झाला, तर मानवाचीही मोठी हानी होते. मानवजातही संपुष्टात येऊ शकते, असा इशारा तज्ञांनी सातत्याने दिला असूनही सर्वसामान्य माणसे आपल्या कोषात इतकी गुरफटलेली असतात, की आपला नाश आपणच ओढवून घेत आहोत, हे त्यांच्या ध्यानातही येत नाही. या स्थितीतून निसर्ग आणि मानव या दोघांनाही वाचवायचे असेल तर मूक जीवांच्या हिताचा विचार करणे मानवासाठी आवश्यक आहे, असा या संस्थेचा संदेश आहे. हा संदेश केवळ शाब्दिकरित्या न देता ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून या संदेशाचा प्रत्यय लोकांना आणून देत आहे. म्हणूनच, असंख्य निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी या संस्थेच्या कार्याशी स्वत:ला जोडून घेतले आहे.