कारवारच्या काळी नदीवरील जुना पूल कोसळला
राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना : एक ट्रक नदीत कोसळला, चालकाला वाचविण्यात यश
कारवार : कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील अंकोला तालुक्यातील शिरुर येथील दरड कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री 1 वाजून 50 मिनिटांनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील काळी नदीवरील 40 वर्षांचा जुना पूल कोसळला आहे. कारवार तालुक्यातील सदाशिवगड आणि कोडीबाग (कारवार) दरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूल बेळगाव-कारवार आणि गोवा-कारवारला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जात होता. या दुर्घटनेमुळे गोव्याहून हुबळीमार्गे तामिळनाडूकडे एसएसएस कंपनीचा एक ट्रक नदीत कोसळला आहे.
काळी पूल सुमारे चाळीस वर्षे सेवेत
काळीनदी आणि अरबी समुद्राच्या संगमापासून काही अंतरावर सदाशिवगड आणि कोडीबाग (कारवार) दरम्यान पूल बांधकामाला 1960 च्या दशकात सुरुवात करण्यात आली. तथापि वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे आणि काळी नदीतील पाण्याचे आवाहन पेलता न आल्याने पूल बांधण्यास कांही कंपन्यांना अपयश आले. शेवटी गॅमन इंडिया या कंपनीने पूल उभारण्याची जबाबदारी स्वीकारली. सदर पूल बांधून तयार व्हायला 1980 चे दशक उजाडले. हा पूल उभारताना काही कामगारांना जीवही गमवावा लागला होता.
एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन
1983-84 मध्ये या पुलाचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते करण्यात आले. 2010 च्या आसपास पुलामध्ये बिघाड निर्माण झाल्याने या पुलावरून होणारी वाहतूक ठप्प झाली होती. पुलाच्या कनेक्टिंग बेअरिंगमध्ये बिघाड झाल्याचा निर्वाळा त्यावेळी तज्ञांनी दिला होता. तथापि, बेअरिंग बदलता न आल्याने पूल त्याच स्थितीत सोडण्यात आला आणि पुढे जुन्या पुलाला समांतर असा नवा पूल तयार करण्यात आल्यानंतर जुन्या पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. योग्य ती दुरुस्ती, डागडुजी, रंगरंगोटी, देखरेख, पथदीप बसविणे आदी कार्ये झालीच नाहीत. पूल दुर्बल झाल्याची जाणीव असूनही सदाशिवगडहून कारवारकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जात होता. तर कारवारहून सदाशिवगडकडे (गोवा-बेळगाव) नव्या पुलाचा वापर केला जात होता आणि शेवटी मंगळवारी रात्री पूल कोसळला.
ठेकेदार, केंद्र सरकारकडून हयगय : पालकमंत्री मंकाळू वैद्य
या दुर्घटनेबद्दल पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या हातात काही नाही. सर्व कांही केंद्र सरकारकडून नियंत्रित केले जात आहे. राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकार किंवा रस्त रुंदीकरणाचे बांधकाम हाती घेतलेली आयआयबी कंपनीबद्दल कितीही ओरडून सांगितले तरी दखल घेतली जात नाही. सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. अशा दुर्घटनांबद्दल केंद्र सरकार चुकूनही शब्द बाहेर काढत नाही. केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या विकासकामांसाठी आवश्यक असलेली जमीन गरिबांच्या घरांची किंवा अन्य आवश्यक बाबींची व्यवस्था करून देणे एवढेच आमच्या हाती राहिले आहे.
आयआरबी कंपनीचे अवैज्ञानिक बांधकाम जबाबदार : आमदार सतीश सैल
या पूल दुर्घटनेची माहिती मिळताच कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या पुलाच्या दुर्घटनेबद्दल जिल्हा प्रशासनाला आपण पाच वर्षांपूर्वीच इशारा दिला होता. तथापि जिल्हा प्रशासनाने किंवा अन्य संबंधितांनी या पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यापलिकडे काहीच केले नाही. जुना पूल कोसळायला नवा पूल बांधलेली आयआरबी कंपनीचे चुकीचे आणि अवैज्ञानिक बांधकाम जबाबदार आहे. कारण या कंपनीने नवापूल बांधताना जुन्यापुलाचा दुरुपयोग केला. नवा पूल बांधण्यासाठी जुन्या पुलाचा टेकू म्हणून वापर करण्यात आला आणि त्यामुळे जुन्या पुलाचे आयुष्य कमी झाले. जुना पूल कमकुवत झाला असा आरोप सैल यांनी केला.
देवामुळेच मोठी दुर्घटना टळली : समाजसेवक माधव नाईक
या जुन्या पुलाच्या दोन टोकांना असलेल्या खापरी देव दुर्गादेवी आणि पुलापासून पूर्वेला आणि पश्चिमेला वास्तव्य असलेल्या अनुक्रमे कालिकामाता आणि नृसिंह देवामुळेच मोठी दुर्घटना टळली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे चांगले मंत्री आहेत. याबद्दल वाद नाही. तथापि, त्यांना वास्तविकतेची माहिती दिली जात नाही. एनएचएआय किंवा आयआरबी कंपनीकडून गडकरींना चुकीची माहिती दिली जात आहे त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असे ते म्हणाले.
सर्वसामान्य जनतेमध्ये भीती
या दुर्घटनेबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे. एवढा मोठा पूल तीन ठिकाणी कोसळतोच कसा? असे विचारले जात आहे. पूल कोसळल्याची घटना दिवसा घडली असती तर काय घडले असते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतकी वर्षे आम्ही बिहारमधील ज्या व्यवस्थेला दोष देत होतो तीच संस्कृती कर्नाटकमध्ये रुजत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थितांनी केला आहे.
सिनेमांच्या चित्रीकरणाची साक्ष ठरलेला पूल
जिल्ह्यासह लाखो देशवासियांच्या आठवणी या पुलाशी जोडल्या गेल्या आहेत. काळी पुलाचा परिसर अतिशय रमणीय असल्याने काही चित्रपटांचे विशेष करून कन्नड चित्रपटांचे चित्रीकरण काळी पुलावर करण्यात आले आहे. सुरुवातीला हा पूल बांधकाम स्थितीत असल्याने येथे ‘गंड बिरुड’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रपटातील अंबरीश, श्रीनाथ, शंकरनाग या अभिनेत्यांनी पुलाचे बांधाकाम करणाऱ्या मजुरांची भूमिका केली होती.
पूल पाहण्यासाठी गर्दी
पूल कोसळण्याची घटना रात्री घडली तरी सोशल मीडियामुळे दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे हा पूल पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी नवीन पुलावर गर्दी केली होती.
नवीन पुलावरून अवजड वाहनांना बंदी
नवीन पुलावरून केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली असून अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे नवीन पुलाच्या दोन्ही बाजुला अवजड वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तामिळनाडूतील त्या ट्रक शिवाय अन्य वाहने किंवा व्यक्ती या दुर्घटनेत सापडली नाही ना? याचा शोध घेतला जात आहे. कारण रात्रीच्यावेळी या पुलावरून अनेक जण मासेमारी करत असतात. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान तैनात होते.
गोव्यातील बसेसना सदाशिवगड येथे थांबा
मडगाव, पणजी-कारवार मार्गावरील कदंब तसेच कर्नाटक परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवासी बसेस सध्या सदाशिवगड येथे थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कारवार आणि अन्य भागांतून गोव्यात येणारे सरकारी, निमसरकारी तसेच खासगी आस्थापनांतील कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांची खूपच गैरसोय झाली आहे. कारवार-मडगाव मार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला काळी नदीवरील जुना पूल कोसळल्यामुळे सर्वच व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या पुलाची क्षमता तपासण्यात आल्यानंतर आणि संबंधित खात्याने दाखला दिल्यानंतरच त्यावरून वाहने सोडण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती अधीक्षक एम. नारायण यांनी दिली. 40 वर्षांपूर्वी ज्यावेळी हा पूल उभारण्यात आला नव्हता त्यावेळी मडगाव-सदाशिवगड अशी बस वाहतूक व्हायची आणि कारवारला जायचे झाल्यास फेरीबोटचा किंवा वनक्षेत्राचा वापर केला जायचा. सध्याच्या पुलावरून अवजड वाहने न्यायला परवानगी नाकारल्यास परत 40 वर्षांपूर्वीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून याची सगळ्याच आर्थिक व्यवहारांना झळ बसण्याची शक्यता असून किती दिवस ही परिस्थिती राहील हे आताच सांगणे कठीण झाले आहे.
- दक्षिण भारताकडील वाहतुकीवर परिणाम
- बेळगाव-कारवार, गोव्याला जोडणारा महत्त्वाचा पूल
- पूल कोसळल्याने राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक ठप्प
- पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात
- नवीन पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी
- नवीन पुलाची क्षमता तपासल्यानंतरच निर्णय
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून दखल
पूल दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांच्याशी फोनवरून संपर्क करून घटनेची माहिती घेतली. जिल्ह्यातील सर्व पुलांची व रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत खात्री करून घेऊन जिल्ह्यात पुलामुळे किंवा रस्त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पालकमंत्री मंकाळू वैद्य यांच्याकडून चालकाला 50 हजार रुपयांची मदत
काळी पूल दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ट्रक चालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी वैद्य यांनी चालकाला 50 हजार रुपयांची मदत केली. त्यावेळी कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के., कारवार जिल्हा पोलीसप्रमुख नारायण आदी उपस्थित होते.