बेळगावातील हिवाळी अधिवेशनासाठी बराक ओबामांना देणार आमंत्रण
काँग्रेस अधिवेशनाचा शतक महोत्सवही थाटात साजरा करणार
बेळगाव : महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे शतक महोत्सव थाटात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पावेळीही यासंबंधीची घोषणा केली होती. पुढील वर्षभर ‘गांधी भारत’ या नावाने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्याचा विचार सुरू आहे. शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष असणारे कायदा व संसदीय व्यवहारमंत्री एच. के. पाटील यांनी बुधवारी बेंगळूर येथे ही माहिती दिली आहे. विधानसौधमध्ये शतक महोत्सव समितीची पहिली बैठक बुधवार दि. 23 ऑक्टोबर रोजी झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना एच. के. पाटील यांनी वरील माहिती दिली.
डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी महात्मा गांधीजी हे जागतिक नेते आहेत, असे जाहीर करणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री ओबामांना पत्र पाठवून काँग्रेस अधिवेशनाच्या शतक महोत्सव कार्यक्रमात भाग घेण्याची विनंती करणार आहेत. 26 व 27 डिसेंबर 1924 मध्ये महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन, स्मारक उभारण्याबरोबरच विविध वैशिष्ट्यापूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे एच. के. पाटील यांनी सांगितले.
महात्मा गांधीजींना ग्रामीण विकास व ग्राम स्वराज्य हे विषय प्रिय होते. त्यामुळे त्या खात्यांच्या सहयोगातून कर्नाटक गांधी स्मारक निधी व गांधी विचारधारा जपणाऱ्या नेत्यांचा सल्ला घेऊन सृजनशील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे एच. के. पाटील यांनी सांगितले. या बैठकीत माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली म्हणाले, शतक महोत्सवच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभर शाळकरी मुले, युवकांवर प्रभाव होईल अशा पद्धतीने गांधी विचारावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्याची गरज आहे, असा सल्ला दिला.
विधान परिषदेचे माजी सभापती बी. एल. शंकर, ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज, माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे, कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी, वनमंत्री ईश्वर खंड्रे, उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, साखरमंत्री शिवानंद पाटील, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आमदार बी. आर. पाटील, जी. टी. पाटील, अल्लमप्रभू पाटील, माहिती खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्यासह या समितीचे सदस्य व अधिकारी यावेळी उपस्थित होते. महात्मा गांधी विचारावर आधारित व तरुणावर प्रभावी ठरणारे कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.