एक अजिंक्य दुर्ग
इतिहासकाळी दुर्ग किंवा किल्ल्यांचे महत्व प्रचंड होते, असे आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक दुर्ग तर प्रसिद्धच आहेत. पूर्वीच्या काळात असे दुर्ग जिंकण्यासाठी विविध राज्यांच्या सैन्यांमध्ये स्पर्धा असे. ज्या राजाकडे असे दुर्ग जास्त तो राजा अजिंक्य मानला जात असे.
परिणामी, हे दुर्ग नेहमीच संघर्षाची स्थाने असत. अनेक दुर्ग अनेक राजांच्या हाती जात. युद्धांमध्ये त्यांचे हस्तांतरण एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे असे होते असे. कित्येकदा तहामध्ये दुर्गांची देवाणघेवाण होत असे. तथापि, जपानमध्ये असा एक दुर्ग आहे, की ज्यावर आजपर्यंत अनेकदा आक्रमणे झाली. कित्येकदा तो शत्रूंनी जिंकण्याचा प्रयत्न केला. तथापि तो दुर्ग आजवर अजिंक्यच राहिलेला आहे.
त्याचे नाव कुमामोतो दुर्ग असे असून तो जपानच्या क्युशू या बेटावरील कुमामोतो शहरात आहे. जगातील बव्हंशी दुर्ग हे दगडांपासून निर्माण केलेले असतात. त्यांचा रंग लाल, पांढरा किंवा राखाडी असतो. पण या दुर्गाच्या दगडाचा रंग काळाभोर आहे. त्याची निर्मिती 1,607 मध्ये झाली. त्यावेळी जपानमध्ये संस्थानिक आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यात सशस्त्र संघर्ष होत होता. त्या काळात काटो कियोमासा नामक सेनापतीने याची निर्मिती केली. हा दुर्ग इतका भक्कम आहे की आजवर त्याचा चिराही निखळलेला नाही. तसेच, तो कोणत्याही शत्रूला जिंकता आलेला नाही. निर्मिती झाल्यापासून एकदाही जिंकला न गेलेला दुर्ग अशी याची ख्याती आहे. सध्या तो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.