राज्यात 25 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित
उद्योगमंत्री एम. बी. पाटील : अमेरिका दौऱ्यात विविध कंपन्या, गुंतवणूकदारांशी चर्चा
प्रतिनिधी, वार्ताहर /बेंगळूर
अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या दौऱ्यातून राज्यात सुमारे 25 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती अवजड आणि मध्यमउद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली केली. बेंगळुरात गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 25 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत 12 दिवसांच्या अमेरीका दौरा केला. दरम्यान, जगातील सर्वोत्तम कंपन्या, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्या बैठका घेतल्या. राज्यात गुंतवणुकीच्या संधीविषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आयटी-बीटी मंत्री प्रियांक खर्गे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अमेरिकेतील विविध ठिकाणी विविध कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली आहे. राज्याचे गुंतवणूकस्नेही धोरण आणि पर्यावरण संवर्धन सर्व कंपन्यांना पटले असून अमेरिका दौरा यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
झपाट्याने बदलणाऱ्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीत अमेरिकेला भेट देणे गरजेचे असून मोठ्या संख्येने जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी एक आकर्षक आणि सुरक्षित ठिकाण म्हणून शोधत आहेत. कर्नाटक हे सध्या अनुकूल धोरण, प्रोत्साहन, तांत्रिक सुविधा, कुशल कामगारांची उपलब्धता यासह विदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल ठिकाण असल्याची खात्री अमेरीका दौऱ्यातून झाली आहे, असेही मंत्री एम. बी. पाटील म्हणाले. 12 दिवसांत शिष्टमंडळाने विविध क्षेत्रातील कंपनी प्रतिनिधींसोबत 27 बैठका आणि 9 संवादात्मक कार्यक्रम घेतले आहे. गुंतवणुकीच्या संधी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक, सेमी-कंडक्टर, एअरोस्पेस, संरक्षण, ऑटोमोबाईल, ईव्ही आणि इतर क्षेत्रांमध्ये शोधल्या गेल्या. यामुळे पुरवठादारांचा आधार वाढेल. राज्य सरकारच्या सहकार्याने उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याबाबत उद्योजकांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
उत्पादन क्षेत्रावर भर
यावेळी बोलताना आयटी-बीटी मंत्री प्रियंक खर्गे यांनी, आम्ही उत्पादन क्षेत्रावर अधिक भर देण्याबाबत चर्चा केली आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये नावीन्य आणण्यासाठी शेमफोर्ड युनिव्हर्सिटीशी भागीदारी करण्याबाबत चर्चा केली असून त्यांनी याला सहमती दर्शवली आहे. नवोद्योगांच्या बाबतीत कर्नाटक 18 व्या क्रमांकावर असून ते 10 व्या क्रमांकाच्या आत आणण्यासाठी इतर देशांशी करार करणे आवश्यक आहे. राज्यात सुमारे 28 हजार नवनवीन उपक्रम आहेत. नवीन रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ विदेशी कंपन्याच नाहीत तर विविध राज्येही कर्नाटकात भांडवल गुंतवणुकीसाठी उत्सुकआहेत. या संदर्भात राज्य सरकार गुंतवणुकीसाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत उद्योग खात्याचे मुख्य सचिव एस. सेल्वकुमार, आयटी-बीटीमंत्री प्रियांक खर्गे, आयटी-बीटी खात्याच्या सचिव एकरुप कौर, उद्योग खात्याच्या आयुक्त गुंजन कृष्ण आदी उपस्थित होते.
‘जीम’ 2024च्या अखेरीस किंवा 2025 च्या प्रारंभी
राज्य सरकारच्यावतीने आगामी जागतिक भांडवल गुंतवणूकदार मेळावा (जीम) 2024 च्या अखेरीस किंवा 2025 च्या प्रारंभी आयोजित करण्यात येईल. गुंतवणुकीसाठी अनेक कंपन्या उत्सुक असून या मेळाव्यात अनेक करार करण्यात येतील.
- एम. बी. पाटील, उद्योगमंत्री