दर्जाहिन रेनकोट प्रकरणाची होणार चौकशी
सफाई कर्मचाऱ्यांना नव्याने रेनकोट देणार का?
बेळगाव : महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात आले. मात्र हे रेनकोट दर्जाहिन असल्यामुळे काही दिवसातच फाटून गेले. याबाबत सफाई कर्मचाऱ्यांनी तक्रारही केली आहे. खरेदी करताना उत्तम प्रतीचे रेनकोट खरेदी करणे गरजेचे होते. मात्र हलक्या दर्जाचे रेनकोट खरेदी करून तातडीने सफाई कर्मचाऱ्यांना ते रेनकोट वितरित करण्यात आले. हा प्रकार उघडकीस आला असून त्याची आता चौकशी होणार आहे.
भल्या पहाटे उठून भर पावसात सफाई कर्मचारी कचऱ्याची उचल करत असतात शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भर पावसातही हे काम ते कर्मचारी नियमित आणि प्रामाणिकपणे करत आहेत. यावर्षी गेल्या आठ दिवसांपासून पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाचा जोर इतका होता की, घरातून बाहेर पडणेही अशक्य होते. अशा पावसामध्ये या सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा उचल करण्याचे काम तसेच गटारी साफ करण्याचे काम केले आहे.
पावसाळ्यापूर्वी मनपाने या कर्मचाऱ्यांना रेनकोट, बूट, हातमोजे, मास्क, हेल्मेट याचे वितरण करणे गरजेचे होते. मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर घाईगडबडीत त्याचे वितरण केले गेले आहे. हे सर्व साहित्य खरेदी करताना उत्तम प्रतीचे खरेदी करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता घाईगडबडीत हलक्या दर्जाचे साहित्य खरेदी केले गेले आहे. परिणामी केवळ दोन दिवसांत रेनकोट फाटून गेले. याचबरोबर बूट व चप्पलही खराब झाले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पावसात भिजतच कामे करावी लागत आहेत.
सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून आहे. गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे. तो गोळा करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. वरून पाऊस आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून काम करताना या सफाई कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातच साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे काही कर्मचारीदेखील पावसात भिजून आणि काम करून आजारी पडले आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणारे साहित्य हे चांगल्या प्रतीचे देणे गरजेचे होते. मात्र महापालिका आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या रेनकोट वितरणामध्ये गोंधळ झाला आहे. तेव्हा त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी याबाबत पाऊल उचलले असून खरेदीबाबत संपूर्ण माहिती ते घेत आहेत. एकूणच सफाई कर्मचाऱ्यांच्या रेनकोट खरेदीमध्येही सावळागोंधळ घडल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.