For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घाऊक महागाई दरात वाढ

06:06 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
घाऊक महागाई दरात वाढ
Advertisement

जूनमध्ये 3.36 टक्के : गेल्या 16 महिन्यांमधील उच्चांक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाच्या घाऊक महागाई दराच्या निर्देशांकात जून महिन्यात मोठी वाढ झाली असून ती 3.36 टक्के इतकी आहे. हा गेल्या 16 महिन्यांमधील उच्चांक आहे. मेमध्ये हा दर 2.6 टक्के इतका होता. अन्नधान्ये आणि उत्पादित वस्तूचे दर वाढल्याने हा निर्देशांक वाढल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत या जूनमध्ये अन्नधान्यांच्या दरात 8.7 टक्के वाढ झाल्याची माहिती देण्यात आली. तर उत्पादित वस्तूच्या महागाई दरात 1.43 टक्के वाढ झाली आहे. फळे, भाज्या आणि डाळी यांच्या दरात गेल्या जूनच्या मानाने यंदाच्या जूनमधील वाढ 9.4 टक्के आहे. ही गेल्या सहा महिन्यांमधील सर्वाधिक वाढ आहे. मे 2024 च्या तुलनेत विचार करता जून 2024 मध्ये घाऊक महागाई दरात 0.4 टक्के वाढ झाली आहे. तर अन्नधान्यांच्या महागाई दरातील वाढ 2.5 टक्के आहे. या वर्षातील ही एका महिन्यातील सर्वाधिक वाढ असल्याचे दिसून येते. उत्पादित वस्तूंचा महागाई दर मेच्या तुलनेत 0.14 टक्के वाढला असून ही वाढ गेल्या चार महिन्यांमधील सर्वात मंदगती वाढ आहे. इंधन आणि विजेचा महागाई दर मात्र घसरला असून ही घट मे महिन्याच्या तुलनेत -1.93 टक्के इतका असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विभागाची प्रतिक्रिया

जूनमधील महागाई दरातील वाढ प्रामुख्याने अन्नधान्यांच्या महागाईमुळे आहे. वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. तसेच अन्नउत्पादने, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच खनिज तेल आणि इतर उत्पादित वस्तूंच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने त्यांचे दर वाढले असल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि व्यापार विभागाने सोमवारी एका पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे.

Advertisement
Tags :

.