For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडविरुद्ध आज पाकिस्तानसमोर अशक्यप्राय आव्हान

06:55 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडविरुद्ध आज पाकिस्तानसमोर अशक्यप्राय आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पाकिस्तानचा सामना आज शनिवारी विश्वचषकातील महत्त्वाच्या लढतीत इंग्लंडशी होणार असून यावेळी प्रचंड मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे जवळपास अशक्यप्राय आव्हान त्यांना पेलावे लागेल. दुसरीकडे, उत्साह वाढलेला इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल.

 

न्यूझीलंडच्या निव्वळ धावसरासरीने आणि त्यांनी श्रीलंकेवर पाच गडी राखून मिळवलेल्या विजयाने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा अक्षरश: धुळीस मिळवल्या आहेत. न्यूझीलंडची धावसरासरी 0.743 इतकी, तर पाकिस्तानची धावसरासरी 0.036 अशी आहे. त्यामुळे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला उपांत्य फेरीकरिता पात्र होण्यासाठी प्रथम फलंदाजी करून सुमारे 287 धावांनी, तर लक्ष्याचा पाठलाग करताना 284 चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. हे जवळजवळ अशक्यप्राय काम आहे.

Advertisement

गतविजेत्या इंग्लंडसाठी विश्वचषक राखून ठेवण्याचे स्वप्न भंग झालेले असले, तरी जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने आघाडीच्या आठ संघांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवून असेल. एकंदरित पाहता बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्ससह इंग्लंड अशी ही चॅम्पियन्स ट्रॉफीतील स्थानासाठीची चौरंगी शर्यत आहे. मागील सामन्यात नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय मिळविल्यामुळे इंग्लंड सातव्या स्थानावर पोहोचले आहे आणि वरील चार संघांचा विचार करता सर्वांत सोपे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कारण बांगलादेश आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारत या बलवान प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे आणि इंग्लंडच्या तुलनेत त्यांची धावसरासरी कमी आहे. हे लक्षात घेता पाकिस्तानविऊद्ध विजया मिळविल्यास इंग्लंडच्या स्थानावर शिक्कामोर्तब होईल.

या विश्वचषकात पाकिस्तान अपेक्षांना जगण्यात अयशस्वी ठरला आहे. परंतु मागील दोन सामन्यांमध्ये त्यांनी काही प्रमाणात उसळी घेतलेली आहे. न्यूझीलंडविऊद्ध पॉवर हिटिंगचे प्रदर्शन घडविलेला सलामीवीर फखर झमानचे गेल्या दोन सामन्यांमध्ये आपली क्षमता दाखविली आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने बाबरसह 141 चेंडूंत 194 धावांची नाबाद भागीदारी करून ते कोणत्याही आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात हे दाखवून दिलेले आहे. दुसरीकडे, सलग पाच सामने गमावलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि डेव्हिड मलान यांनी मागील दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांची शाहीन शाह आफ्रिदी व रौफविऊद्धची लढत ही रंजक ठरेल.

ज्यो रूट, हॅरी ब्रूक आणि कर्णधार जोस बटलर हेही काही प्रमाणात योगदान देतील आणि त्यांच्या विश्वचषकातील खराब मोहिमेला शेवटच्या घडीला तरी उंचावतील, अशी इंग्लंड आशा बाळगून असेल. वोक्सने फलंदाजी व गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. वोक्स व डेव्हिड विलीच्या रुपाने इंग्लंडकडे चांगली वेगवान गोलंदाजांची जोडी आहे आणि पाकिस्तानच्या फॉर्मात असलेल्या फखर व बाबर यांच्याविऊद्ध त्यांची लढत चांगलीच रंगेल. फिरकीला अनुकूल परिस्थितीचा फायदा उठविण्याच्या दृष्टीने इंग्लंड मोईन अली व आदिल रशिदवर अवलंबून असेल.

संघ : इंग्लंड-जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कारसे, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स.

पाकिस्तान-बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसिम.

सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.

Advertisement
Tags :

.