नंदगड महालक्ष्मी यात्रेचा महत्त्वाचा विधी उत्साहात
वार्ताहर/हलशी
नंदगड महालक्ष्मी यात्रेचा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी गणला जाणारा लक्ष्मी रंगकामाच्या विधीसाठी महालक्ष्मी देवीला उतरवून भिजत घालण्याचा विधी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मंगळवारी सकाळी पार पडला. यानिमित्त गावातील मुख्य देवस्थानात गाऱ्हाणा घालण्यात आला. तसेच नंदगड येथील महिलांनी कलशातून आणलेल्या पाण्यात विधीवत महालक्ष्मी मूर्ती उतरवून भिजत घालण्यात आली. यावेळी यात्रा कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे नंदगडमध्ये यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सकाळी 11 वाजता रितीरिवाजाप्रमाणे कलमेश्वर मंदिर, माउली मंदिर, दुर्गादेवी मंदिर, श्री लक्ष्मीदेवी मंदिर, मरेव्वादेवी मंदिरातून गाऱ्हाणा घालण्यात आला. त्यानंतर पाण्याने भरलेल्या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला डोक्यावर मंगलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाला यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील व विविध कमिटीचे पदाधिकारी, मानकरी, बनकरी, हक्कदार, वतनदार, सल्लागार, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवावर्ग उपस्थित होता.