For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डेंग्यूविरोधात उद्योजकाचा स्वखर्चाने एकाकी लढा

11:21 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
डेंग्यूविरोधात उद्योजकाचा स्वखर्चाने एकाकी लढा
Advertisement

विनोद नाईक यांच्याकडून शहरात फॉगिंग सेवा

Advertisement

बेळगाव : बेळगावात डेंग्यूचा फैलाव वाढतो आहे. डेंग्यू रोखण्यासाठी महानगरपालिका व आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरूच आहेत. महानगरपालिकेकडून शहरातील वेगवेगळ्या भागात फॉगिंग करण्यात येत आहे. आता सामाजिक जाणीवेतून एका उद्योजकानेही या कामी हातभार लावला असून स्वत:ची यंत्रणा राबवून शहरातील वेगवेगळ्या भागात स्वखर्चाने फॉगिंग सुरू केले आहे. येथील तिरुपती ट्रॅव्हल्सचे संचालक विनोद नाईक यांनी सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी स्वत:ची वाहने व स्वत:च्या कामगारांना जुंपले आहे. रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात फॉगिंग सुरू ठेवले आहे. यासाठी लागणारे साहित्य व मनुष्यबळ स्वत:च पुरविले आहे. एखाद्या दिवशी मनुष्यबळ तोकडे असल्यास ते स्वत:च या कामगिरीवर निघतात.

ज्या ज्या वेळी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो, त्या त्या वेळी केवळ सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता स्वत:चीही जबाबदारी ओळखून विनोद नाईक यांनी स्वत:ला अशा कामात गुंतविले आहे. सध्या रोज सकाळपासून सरकारी कार्यालये, उपनगरे, झोपडपट्टी परिसर व खासकरून गरीब व मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत त्यांनी फॉगिंग सुरू ठेवले आहे. बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातही फॉगिंग करण्यात आले. गुरुवारी सकाळपासून महांतेशनगर, माळमारुती परिसरात फॉगिंग हाती घेण्यात आले होते. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. केवळ सरकारी यंत्रणेवर विसंबून राहून चालणार नाही. रोगराई रोखण्यासाठी स्वत:ची जबाबदारीही पार पाडली तरच ते आटोक्यात येणार आहे, असे विनोद नाईक यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.