साम्राज्यच...पण प्रजेविना
साम्राज्य हा शब्द कानावर पडला की आपल्यासमोर भव्यदिव्य असे काहीतरी उभे राहते, असा अनुभव जवळपास प्रत्येकाचा आहे. आपल्या देशात मौर्य वंश, गुप्त वंश, छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश अशा अनेक वंशांची साम्राज्ये आपल्या देशात नांदली आहेत. अनेक साम्राज्यांचा विस्तार प्रचंड होता. काही साम्राज्ये तर सध्याच्या भूगोलाच्या दृष्टीने अनेक खंडांमध्ये विस्तारलेली होती. या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात छोटे साम्राज्य कोणते असेल, असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे.
इटली देशाच्या सार्दिनिया सागरतटापासून काही अंतरावर तावोलारा नावाचे बेट आहे. तेथे पूर्वीच्या काळात एक साम्राज्य नांदून गेले होते. ते साम्राज्यच होते पण तेथे प्रजा नव्हती. या साम्राज्यात केवळ एक राजा आणि त्याच्या दोन राण्या असे तीनच जण होते. एकही नागरीक कधी नव्हता. हे जगातील सर्वात लहान साम्राज्य म्हणून आजवर आपला नावलौकिक टिकवून आहे. आजही ते अस्तित्वात आहे, ह sविशेष. आजही या बेटावर राजघराण्यातील एक कुटुंब राहते आणि ते स्वत:ला या साम्राज्याचे स्वामी म्हणवून घेते. इटलीचे प्रशासनही याला विरोध करत नाही.
तर या साम्राज्याच्या स्थापनेचे सत्य असे की, या पाच चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बेटावर इसवी सन 1807 मध्ये एक जमीनदार, जो समुद्री लुटेरा म्हणूनही ओळखला जात होता, तो आपल्या दोन पत्नींसह वास्तव्यास आला. त्याने स्वत:ला या साम्राज्याचा सम्राट घोषित केले. त्याचा पुत्रही नंतर सम्राट झाला. अशाप्रकारे वंशपरंपरागत हे साम्राज्य आजवर अस्तित्वात आहे. या बेटावर केवळ या ‘राजघराण्या’चे वंशजच राहतात. प्रजा कोणीही नसते, अशी स्थिती आहे.