राज्यातील पाच दिवशीय गणरायाला भावपूर्ण निरोप
पणजी : राज्यातील पाच दिवशीय श्री गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ग्रामीण भागातील तलाव, विहिरी, नदी आदी ठिकाणी श्री गणेशमूर्तीचे थाटात विसर्जन करण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत विसर्जनासाठी भाविकांनी विसर्जनस्थळी गर्दी केली होती. 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन झाल्यानंतर काल बुधवारी पाचव्या दिवशी पाच दिवशीय गणपतीचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ असे म्हणत भाविकांनी गणेश मिरवणूक काढली. राज्यातील बहुतांश भाविक हे पाच दिवस गणपती पूजन करतात. पारंपरिक उत्सव परंपरा असल्याने एकाच वाड्यातील अनेक गणेशमूर्ती एका ठिकाणी आणून एकत्र आरती करून वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणेश मिरवणूक सुरू होती.
विसर्जनस्थळी व आवश्यक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. पंचायत व पालिकांमार्फत विसर्जनस्थळी भाविकांसाठी विजेची सोय करण्यात आली होती. विसर्जन मंडपात गणेशमूर्ती आल्यानंतर भाविकांनी गणरायाची आरती करून मूर्ती विसर्जित केल्या. पणजी शहर परिसरात राहणाऱ्या भाविकांनी मांडवी नदी पात्रात तसेच मिरामार समुद्रकिनाऱ्यात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. गणेश विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी संगीताच्या तालावर पारंपरिक गाणी म्हटली. मांडवी नदी पात्रात गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी जलस्रोत खात्यातर्फे योग्य नियोजन करून फेरीबोटसेवा उपलब्ध करून दिली होती. या फेरीबोटीच्या साहाय्याने अनेक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.