पाचगावातील वृद्धेचा कोरोनाने मृत्यू
कोल्हापूर :
कोरोनाचा संसर्ग झालेल्या वृद्धेचा रविवारी सकाळी सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. मंगल जाधव (वय 75, मुळगाव सांगली, सध्या राहणार पाचगाव, रायगड कॉलनी) असे सदर वृद्धेचे नाव आहे. अद्यापही 6 रूग्णावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
संबधित महिलेला धाप लागण्याचा त्रास होऊ लागल्याने बुधवार दि.28 मे रोजी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यांना निमोनियासह मधुमेह, उच्च रक्तदाब असे त्रास होते. खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांचा स्वॅब तपासला असता कोरोना झाला असल्याचे निदान झाले.
त्यांना त्रास वाढू लागल्याने पुढील उपचारासाठी गुरूवार दि.29 रोजी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. सीपीआरमध्ये डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ व्हेंटिलेटरवर उपचार सुरू केले होते. गेल्या तीन दिवसापासुन त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्याकडून उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. रविवार त्यांची तब्येत खालावत गेली. सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
गत पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील पाचजणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका वृद्धेचा मृत्यू झाला असुन उर्वरित सहा जणांवर उपचार सुरू आहेत. यातील चारजणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पेंपळे यांनी केले आहे. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या नोतवाईकांची कोरोना चाचणी केली असता सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- सीपीआरमध्ये 24 तास सुविधा उपलब्ध
सीपीआरमध्ये कोरोना वार्ड तयार असुन यामध्ये 35 बेड सज्ज ठेवले आहेत. व्हेंटिलेटरचाही मुबलक साठा आहे. सीपीआरमध्ये डॉक्टरांचे पथक 24 तास तैनात असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र मदने यांनी सांगितले.
- 50 हजार पीपीई किट उपलब्ध
महापालिकेकडे 50 हजार पीपीई किट उपलब्ध आहेत. नागरिकांनी पोषक आहार, व्यायाम, योगा करावा. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. आवश्यक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरचा वापर कारावा. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे.
डॉ. प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, महापालिका