सह्याद्रीनगर येथील चोरी प्रकरणी फोंड्यातून वृद्ध ताब्यात
बेळगाव : सह्याद्रीनगर येथील एका घरफोडीप्रकरणी तिस्क-उसगाव, ता. फोंडा, गोवा येथील एका वृद्धाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून पावणे चार लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गवीसिद्धाप्पा ऊर्फ शिवाप्पा ऊर्फ मंजुनाथ लक्ष्मणाप्पा हुलसेर ऊर्फ कणकेरी (वय 72) मूळचा राहणार रघुनाथ पेठ, अनगोळ, सध्या राहणार तिस्क-उसगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 33 ग्रॅम 130 मिली सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 7 नोव्हेंबर 2025 रोजी एपीएमसी पोलीस स्थानकात सह्याद्रीनगर येथील लीना अमजद पठाण यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गवीसिद्धाप्पाला अटक करून त्याच्याजवळून सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.