स्वच्छतेसाठी पुरस्कारप्राप्त परुळे गावातच अस्वच्छतेचा कळस
निर्मलग्राम अभियानाचा उडाला बोजवारा ; शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीला हरताळ ; परूळे बाजार ग्रामपंचायत क्षेत्रात विदारक चित्र
परूळे/प्रतिनिधी
प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे तसेच पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, भारत स्वच्छ मिशन अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे पुरस्कारही देण्यात आले. मात्र केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांनी अनेक वेळा गौरविलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील अनेक पुरस्कार प्राप्त परूळे गावामध्येच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाच्या योजने अंतर्गत अनेक गावात स्वच्छता करून, घरोघरी शौचालय बांधण्यास लावणे, त्याचा नियमित वापर करून गाव हांगनदारी करणे हा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील काही गावे सहभागी झाली होती. अशा गावांचे केंद्रस्तरीय समिती व राज्य समितीमार्फत मूल्यांकन करून विविध पुरस्कार देण्यात येतात. समिती येण्याच्या कालावधीत गावात साफसफाई जोरात करण्यात येते. मात्र, त्यानंतर कचरा उघड्यावर फेकल्याने मुक्या जनावरांना या नाशवंत कचऱ्याचे बळी जावे लागते. मात्र , आजमितीस पुरस्कार प्राप्त गावांचा आढावा घेतला असता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ देखावा म्हणून पुरस्कारासाठी गावात स्वच्छता होत असेल तर त्याचा गावाला काय फायदा, ही स्वच्छता कायमस्वरुपी असावी असे मत गावातील काही सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘स्वच्छतेपासून समृद्धीकडे’चा नारा शासनाने दिला असून या अंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, स्वच्छ भारत मिशन अभियान यासारख्या योजना सुरू करून लोकसहभागातून ग्रामविकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये राज्यस्तर, विभास्तर, जिल्हास्तरावर लाखो रुपयाचे पुरस्कारही आहेत. मात्र गावांनी पुरस्कार मिळण्यापुरतेच गाव स्वच्छ केले, त्यामुळे या योजनेचे आधीच तीनतेरा वाजले आहेत. गावातील कुटुंबाकडे १०० टक्के शौचालय, स्वच्छतागृह, शोषखड्डे, व्यक्तिगत स्वच्छता, सांडपाणी, घर स्वच्छता असे निकष राखून देण्यात आले होते. मात्र या निकषांची कुठेही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळेच पुरस्कार प्राप्त गावामध्येच सर्वाधिक अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे.