कर्णधारपदाचा ‘शुभ’ आरंभ
भारत वि इंग्लंड पहिली कसोटी : जैस्वाल, गिलची शानदार शतके, पंतचीही अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला दिवस यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांनी गाजला. जैस्वाल, शुभमन गिलची शतके आणि ऋषभ पंतची अर्धशतकी खेळी या जोरावर भारताने पहिल्या दिवशी 3 गडी गमावत 359 धावा केल्या. जैस्वालने कसोटीतील पाचवे तर इंग्लंडमधील पहिले तर त्यांच्याविरुद्धचे एकूण तिसरे शतक झळकावले. गिलनेही कसोटी कर्णधार या नात्याने पहिल्याच सामन्यात शतक साजरे केले. त्यांच्या खेळीमुळे सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताला वरचष्मा राखता आला आणि यजमान इंग्लंडला बॅकफूटवर ढकलता आले. पहिल्या दिवशीअखेर गिल 127 तर पंत 65 धावांवर खेळत होते.
हेडिंग्लेच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो या मैदानाच्या अलिकडच्या रेकॉर्डचा विचार करता इंग्लिश संघाच्या बाजूने होता. परंतु यशस्वी जैस्वालने आपल्या फलंदाजीने हा निर्णय चुकीचा सिद्ध केला. केएल राहुलसह डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या जैस्वालने सुरुवातीपासूनच समजूतदारपणे खेळी केली. त्याने इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत धावा केल्या. जैस्वाल आणि केएल राहुल या जोडीने संघाला चांगली सुरूवात करून दिली.
लीड्सच्या मैदानावर या भारतीय जोडीने कोणतीही विकेट न गमावता 64 धावांचा टप्पा ओलांडताच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. या जोडीने सुनील गावसकर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा 39 वर्षांचा जुना विक्रम मोडला. 1986 मध्ये लीड्सच्या मैदानावर सुनील गावसकर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत या सलामी जोडीने सलामीच्या सामन्यात 64 धावांची भागीदारी केली होती. आता हा 39 वर्षे जुना विक्रम जैस्वाल आणि राहुल यांनी मोडला आहे. पहिल्या सत्रात शानदार सुरूवात केल्यानंतर भारताला लंच ब्रेकच्या आधी लागोपाठ दोन धक्के बसले. पहिल्या सत्राच्या शेवटी राहुल बाद झाला. त्याने 78 चेंडूत आठ चौकारांसह 42 धावा केल्या आणि सलामीची भागीदारी 91 धावांवर तुटली. त्यानंतर पदार्पण करणारा साई सुदर्शन जास्त काळ टिकू शकला नाही आणि खाते न उघडताच बेन स्टोक्सच्या जाळ्यात अडकत बाद झाला.
जैस्वालचे नाबाद शतक,
केएल राहुल, साई सुदर्शन बाद झाल्यानंतर जैस्वालने कर्णधार शुभमन गिलला सोबत घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने शतकी भागीदारी साकारत संघाचे द्विशतक फलकावर लावले. जैस्वालने 144 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. सलग दोन चौकार मारत जैस्वाल 99 धावांवर पोहोचला, त्यानंतर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने आपले शतक पूर्ण केले. यानंतर जैस्वालने मैदानात लांब धाव घेत आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. शतकानंतर उडी मारत पारंपरिकपणे त्याने शतकाचे सेलिब्रेशनही केले. अर्थात, इंग्लंडमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले आहे. शतकानंतर मात्र तो लगेच बाद झाला. स्टोक्सने त्याला 101 धावांवर त्रिफळाचीत केले. कर्णधार गिलने दमदार साथ देताना नाबाद 58 धावांची खेळी साकारत जैस्वालला चांगली साथ दिली होती.
कर्णधार गिलचा पहिलाच हिट शो
शुभमन गिलने चौथ्या क्रमांकावर खेळून शतक साजरे केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतले हे सहावे शतक ठरले. पण विशेष म्हणजे कसोटी कर्णधार या नात्याने त्याने पहिल्याच दिवशी शतक साजरे केले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराट कोहलीच्या जागी गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. संघाचे 2 फलंदाज 92 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. गिलने जैस्वालसोबत 129 धावांची शानदार भागीदारी केली. यशस्वी आऊट झाल्यानंतर त्याने ऋषभ पंतसोबत संघाचा डाव पुढे नेला. या दोघांनी शतकी भागीदारी साकारताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. गिलने 175 चेंडूत 16 चौकार व 1 षटकारासह नाबाद 127 धावांची खेळी साकारली. पंतनेही त्याला चांगली साथ देताना 102 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 65 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 85 षटकांत 3 गडी गमावत 359 धावापर्यंत मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 85 षटकांत 3 बाद 359 (यशस्वी जैस्वाल 101, शुभमन गिल खेळत आहे 127, ऋषभ पंत खेळत आहे 65, केएल राहुल 42, साई सुदर्शन 0, बेन स्टोक्स 2 तर कार्से 1 बळी).
पदार्पणातच साई सुदर्शनच्या पदरी ‘भोपळा’
इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. राहुलच्या विकेटनंतर साई सुदर्शन फलंदाजीला आला. लंचला अवघी काही मिनिटे बाकी असताना तो झेलबाद झाला आणि भारताने दुसरी विकेट गमावली. गेल्या 14 वर्षांच्या भारताच्या कसोटी इतिहासात कसोटी पदार्पणात शून्यावर बाद होणारा साई पहिलाच खेळाडू ठरला आहे. साईला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. पण पहिल्याच सामन्यात तो इंग्लंडच्या सापळ्यात अडकला.
वात आला, हाताची बोटे आखडली तरी....
सध्याच्या घडीला इंग्लंडमधील वातावरण थंड आहे, त्यामुळे खेळाडूंच्या हाताला वात येत आहे. या खेळी दरम्यान, यशस्वी जैस्वालची बोटेही आखडलेली, तरीही त्याने न थांबता खेळ चालू ठेवला. त्याच्या फलंदाजीतील संयम आणि स्ट्रोक्स बघून मैदानावर उपस्थित प्रेक्षक आणि टीव्हीसमोरचे जग थक्क झाले. यशस्वीने केवळ शतकच झळकावले नाही, तर इंग्लंडच्या कसोटी इतिहासात पदार्पणाच्याच सामन्यात शतक करणाऱ्या मोजक्या परदेशी खेळाडूंमध्ये आपलं नाव कोरले. त्याने 144 चेंडूत हे शतक पूर्ण केले.
पहिल्यांदाच कॅप्टन्सी अन् खास क्लबमध्ये एंट्री
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक झळकावून गिलने इतिहास रचला. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या निवडक भारतीय कर्णधारांच्या यादीत तो सामील झाला आहे. त्याच्या आधी विजय हजारे (1951, दिल्ली), सुनील गावसकर (1976, ऑकलंड) आणि विराट कोहली (2014, अॅडलेड) यांनी ही कामगिरी केली होती. याशिवाय, गिलचे हे इंग्लंडमधील पहिलेच तर परदेशातील दुसरे शतक ठरले आहे.