Miraj News : मिरज लोणी बाजारात अतिक्रमण हटवताना दुकान पेटवण्याचा प्रयत्न
लोणी बाजारात पुन्हा महापालिकेची धडक कारवाई
मिरज : शहरातील लोणी बाजार येथे बेकायदेशीर अतिक्रमण हटवताना संबंधित अतिक्रमणधारकाने दुकानावर पेट्रोल ओतून दुकान पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर महापालिका अतिक्रमण पथकाने कोणताही विरोध नजुमानता कारवाई करून अतिक्रमण हटविले. दुकान पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित दुकानमालकाला पोलिसांनी ताब्यातघेतले. या प्रकाराने खळबळ उडाली.
शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून बेधडक कारवाई सुरू आहे. मागील आठवड्यात शहरातील लक्ष्मी मार्केट लोणी बाजार दत्त चौकसह प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली होती. मात्र लोणी बाजार रस्त्यावरील एका पानपट्टीच्या अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ठ होता. महापालिकेने संबंधित अतिक्रमण धारकाला मुदतही दिली होती. मात्र वारंवार नोटीस देऊनही संबंधितअतिक्रम हटविले गेले नसल्याने शनिवारी सायंकाळी महापालिकेने पुन्हा कारवाई सुरू केली.
यावेळी तेथील एक पान टपरी हटवताना संबंधित अतिक्रमणधारकाने गोंधळ घातला. संबंधित अतिक्रमणधारकाने अतिक्रमण केलेल्या खोक्यावर पेट्रोल फेकले. त्यानंतर आग लावण्याची धमकी देऊन अतिक्रमण हटाव पथकाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र न जुमानता पथकाने कारवाई केली. पोलिसांनी संबंधित अधिक्रमण धारकाला ताब्यात घेतले.