37 हजार फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न
महिलेच्या प्रतापाने प्रवासी भयभीत ः विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान एका महिलेने 37 हजार फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली. मानसिक आजारामुळे तिने हे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे. संबंधित महिला पतीला न सांगता घरातून निघून गेली होती. फ्लाईटमध्ये तिच्याकडे कोणतेही सामान नव्हते.
गेल्या आठवडय़ात साउथवेस्ट फ्लाईट-192 टेक्सासमधील ह्यूस्टन शहरातून ओहायोमधील कोलंबसला जात असताना एका महिलेने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ निर्माण झाली. 34 वषीय अलोम एग्बेग्निनाऊ नामक महिला प्रवासी अचानक विमानाचा दरवाजा उघडू लागली. एका प्रवाशाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिने त्या व्यक्तीला चावा घेतला. तसेच इतरांशी हुज्जतही घातली. या प्रकाराने सर्व प्रवासी भयभीत झाले. यासंबंधी महिलेची अधिक चौकशी केली असता येशूने आपल्याला तसे करण्यास सांगितल्याचे उत्तर तिने दिले. ही घटना 26 नोव्हेंबरची असली तरी पोलिसांनी अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात घटनेची संपूर्ण माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. आता या घटनेसंबंधीचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
न्यायालयात दिली संपूर्ण माहिती
अलोम एग्बेग्निनाऊ ही प्रवासी महिला अचानक आपल्या सीटवरून उठली आणि विमानाच्या बाहेर पडण्याच्या दरवाजाकडे चालू लागली. हे पाहून एका अटेंडंटने त्यांना पुन्हा जागेवर बसण्यास सांगितले. मात्र, संतप्त झालेल्या महिलेने अटेंडंटसह अन्य प्रवाशांशी हुज्जत घातली. तिने बळजबरीने दरवाजाचे हँडल पकडून ओढायला सुरुवात केली. यादरम्यान विमान 37 हजार फूट उंचीवर उडत होते, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.