महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आत्मज्ञानी आवश्यक तेव्हढीच कर्मे करतो

09:58 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, निरपेक्षतेने कर्म केले की ते साधकाला जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त करते हे आध्यात्मिक तत्व आहे. जो ह्याप्रमाणे कर्म करत असतो त्याला त्या तत्वाचे दर्शन होते. म्हणजे त्या तत्वाची अनुभूती येते. अशा मनुष्याला ज्ञाता म्हणतात. त्याला केलेल्या कर्मातून पाप पुण्याचं बंधन लागत नाही. कर्मयोगाच्या आचरणामुळे त्याच्या अंत:करणात आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. त्या ज्ञानाग्नीत त्याचं पाप पुण्य जळून गेलेलं असतं. हे तत्वदर्शन ज्याला झालंय तोआत्मज्ञानी होतो. असा ज्ञाता मनुष्य सदैव आत्मानंदात तृप्त होऊन डुंबत असतो ह्या अर्थाचा फलतृष्णां विहाय स्यात्सदा तृप्तो विसाधन । उद्युक्तो पि क्रियां कर्तुं किंचिन्नैव करोति स ।।26 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. तत्वदर्शन झालेला ज्ञानी प्रत्यक्षात ईश्वराने दिलेलं कर्म करत असताना दिसतो परंतु त्याचा त्या कर्माकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन मी करत असलेलं कार्य हे ईश्वरी कार्य आहे आणि माझ्याकडून तो ते पूर्ण करून घेत आहे असा असतो. त्यामुळे त्या कर्माबाबत वा त्याच्या फळाबाबत कोणतेही विचार त्याच्या मनात येत नाहीत. संपूर्ण निर्विचार होणं म्हणजे परमानंद अनुभवणे असं म्हणता येईल. ही परमार्थातील फार मोठी उच्चावस्था आहे. समजा आपण रस्त्याने निघालो आहोत आणि एक आलिशान बंगला आपण पाहतो. आपली परिस्थिती लक्षात घेता तशा पद्धतीचा बंगला बांधणं आपल्या आवाक्यात नसतं मग आपण काय करतो तर क्षणभर त्या बंगल्याकडं पाहतो आणि छान आहे असं म्हणून पुढे सरकतो. पुढल्या क्षणी त्या बंगल्यासारखा बंगला आपल्याला हवा ही अपेक्षाच काय त्याबाबतचा विचारही आपल्या मनातून नाहीसा झालेला असतो. समोर दिसतंय त्यातून आपल्याला लाभही नाही आणि हानीही नाही याची खात्री असल्याने तो त्याबद्दल सदैव निर्विचार असतो व आत्मानंदात मग्न असतो.

Advertisement

अशी निर्विचार मन:स्थिती आजाणतेपणाने का होईना ताह्या मुलाची असते. ताह्या मुलाला त्याची आई दुपट्यावर ठेवते. त्याला अजून मी आणि माझे या दोन गोष्टी कळलेल्या नसल्याने त्यासंबंधी त्याच्या मनात कोणतेही विचार येत नसतात. साहजिकच ते आपल्याच नादात इतरांच्याकडे स्मितहास्य करत आनंदाने हातपाय हलवत दुपट्यावर पडलेले असते. त्याचा निजानंदात राहण्याचा गुण पाहून दत्त अवधुतानी बालकाला गुरु मानले आहे. असा मनुष्य कायम समाधानी असतो. त्याला कसलाही घोर लागलेला नसल्याने कोणत्याही अपेक्षेविना संसारातली कर्मे केवळ एक कर्तव्य म्हणून करत असल्याने त्याने कर्म टाळले असे होत नसल्याने त्याला पातक लागत नाही असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

निरीहो निगृहीतात्मा परित्यक्तपरिग्रह ।

केवलं वै गृहं कर्माचरन्नायाति पातकम् ।। 27 ।।

अर्थ-निरिच्छ, इद्रियांचा निग्रह केलेला, सर्व परिग्रह म्हणजे साठा करण्याचा स्वभाव टाकून दिलेला मनुष्य केवळ गृहसंबंधी कर्म करतो तरीही त्याला पातक लागत नाही. विवरण- कोणत्याही इच्छा मनात नसल्याने आपोआपच त्या पूर्ण होतील की नाही इत्यादि विचार आत्मज्ञानी माणसाच्या मनात येत नाहीत. मनातले विचार थांबल्यामुळे, अमुक एक हवं असं वाटायचंही बंद होते. साहजिकच त्यांची इंद्रिये त्याच्या निर्विचार मनाला विविध आकर्षणे दाखवू शकत नाहीत. त्याला ज्यावेळी एखाद्या गोष्टीवर विचार करावा असे वाटत असेल फक्त त्याचवेळी त्यांची इंद्रिये कार्यरत होतात. थोडक्यात सामान्य माणसाला इंद्रिये त्यांच्या हातातले बाहुले बनवत असतात पण ज्ञानी मनुष्य त्यांच्यावर अधिकार गाजवून त्यांना त्याच्या हुकमतीत ठेवत असतो. म्हणून त्याला जितेंद्रिय असे म्हणतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article