दोन सैनिकांची ‘सेना’
कोणाच्या डोक्यात कोणती कल्पना येईल आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तो काय करेल, याचे अनुमान करता येणे अशक्य आहे. अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. येथे दोन तरुण तरुणांनी त्यांची स्वत:ची एक सेना (आर्मी) निर्माण करुन एक बेट स्वत:च्या स्वामीत्वाखाली आणण्याची योजना केली होती. यांचा हेतू या बेटावर आपले साम्राज्य निर्माण करणे आणि या बेटावरील लोकांना आपले दास बनविणे हा होता, असेही उघड झाले आहे. या तरुणांची नावे गेव्हिन व्हिसेनबर्ग (वय 21) आणि टॅनर थॉमस (वय 21) अशी आहेत. हैती या देशानजीकचे ‘गोनाब’ हे बेट त्यांना जिंकायचे होते. या बेटाची लोकवस्ती 87 हजार आहे.
पोलिसांना वेळीच या योजनेची माहिती समजली आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांची योजना ऐकून पोलिसांवरही थक्क होण्याची वेळ आली. केवळ त्या बेटावर ताबा मिळविणे, एवढाच त्यांचा हेतू नव्हता. तर बेट स्वत:च्या हाती घेतल्यानंतर तेथील सर्व पुरुषांची ते हत्या करणार होते. त्यानंतर त्या बेटावरील सर्व महिलांना आणि मुलींना ते आपल्या गुलाम बनविणार होते. हे काम केवळ आपण दोघेच करु शकणार नाही, याचीही जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील काही बेघर युवकांशीही संधान बांधले होते. त्यांची एक भाडोत्री सैनिक तुकडी बनविली जाणार होती. या तुकडीद्वारे हल्ला करुन हैती सरकार उलथविण्याचे त्यांचे कारस्थान होते. पोलीसांच्या आतापर्यंतच्या अन्वेषणात ही सर्व माहिती उघड झाली आहे. या दोन्ही युवकांना आता अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे सादर केले गेले आहेत.
विदेशी भूमीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे, विदेशी भूमीवर हत्या करण्याचा कट करणे, चाईल्ड पोर्नोग्राफी आणि हिंसाचार घडविणे असे अत्यंत गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंदविण्यात आले असून ही योजना या युवकांनीच बनविली होती, की त्यांच्या पाठीमागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा आंतरराष्ट्रीय कट आहे, याचाही शोध घेतला जात आहे. सध्या अमेरिकेत हा चर्चेचा विषय बनला असून या युवकांना हे करण्याची प्रेरणा कोठून मिळाली, हे देखील शोधले जात आहे. या युवकांच्या मानसिक स्थितीचेही परीक्षण तज्ञांकडून केले जात आहे.