सांखळी सरकारी शाळेतील बदलत्या मानसिकतेचे अप्रुप
बदलती सकारात्मक मानसिकता : सर्वांचे लक्ष वेधून घेतेय शाळा,नव्या शैक्षणिक वर्षास प्रवेश
पणजी : सरकारच्या अत्याधुनिक तथा पहिल्या ग्रीन शाळेचे अप्रुप वाढतच असून या शाळेत आता प्रवेश देणे सुरू झाले आहे. त्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन शाळेच्या आवारातून एक ‘बलून’ आभाळात सोडण्यात आला आहे. दूरवरून कुठूनही तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विठ्ठलपूर-सांखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा ही गोव्यातील सरकारी पातळीवरील बहुचर्चित आणि विद्यार्थीप्रिय आधुनिक शाळा आहे. या शाळेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी कोनशिला बसवली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गतवर्षी या शाळेचे उद्घाटन केले. अन्य कोणत्याही खाजगी क्षेत्रातील शाळेपेक्षा सांखळी पंचक्रोशीतील ही सरकारी शाळा संस्कारक्षम शिक्षण देणारी, सर्व सोयींनी युक्त अशी शाळा असून मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी या शाळेशी जोडले गेले आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षास प्रवेश
या शाळेत 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश दिला जात असून शाळा जरी सरकारी असली तरी या शाळेतील पालक-शिक्षक संघ फार सक्रिय आहे. हा संघ शाळेमध्ये विविध उपक्रम राबवतो. त्यामुळेच केवळ सांखळी परिसरातील नव्हे तर आसपासच्या भागातील अनेक पालक या शाळेत आपल्या मुलांना पाठविण्यास तयार होतात.
बदलती सकारात्मक मानसिकता
सरकारी शाळांकडे नाक मुरडणाऱ्या पालकांसाठी सांखळीची ही सरकारी शाळा आता एक आदर्श शाळा बनली असून सरकारी शाळेबाबत जी काही मते आहेत त्यात आता मोठ्या प्रमाणात बदल झाला असून पालकांचीही मानसिकता या शाळेमुळे व तेथील व्यवस्थापनामुळे पूर्णपणे बदलून गेली आहे.
प्रवेशाची कल्पना देतानाही सुंदर कल्पकता...
विठ्ठलपूरची ही सरकारी प्राथमिक शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शाळेत प्रवेश देण्यास सुरुवात झाल्याची कल्पना देण्यासाठी शाळेच्या आवारातून एक मोठा फुगा आकाशात सोडलेला आहे. त्याची दोरी शाळेच्या आवारात बांधली आहे. या ‘शाळेत प्रवेश नोंदणी सुरू’ असे या पिवळ्या रंगाच्या फुग्यावर लाल व काळ्या रंगाने अक्षरे रेखाटण्यात आली आहेत. संपूर्ण सांखळीत कुठूनही प्रवेश करताना हा फुगा चटकन लक्ष वेधून घेतो.
सर्वांचे लक्ष वेधून घेते शाळा
या शाळेचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष वर्धमान शेंदुरे यांच्या डोक्यात एकापेक्षा एक भन्नाट कल्पना येतात. त्यातून ते सरकारी शाळा लोकप्रिय बनविण्यासाठी अनेक योजना आखत असतात. विठ्ठलापूरच्या विठ्ठल रखुमाई सरकारी शाळेला मिळालेल्या प्रतिसादामुळे काही खाजगी शाळांनीदेखील आपल्या धोरणात आता बदल करण्यास प्रारंभ केला आहे. आकाशात फुगा सोडण्यात आला, त्यावेळी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष वर्धमान शेंदुरे, मुख्याध्यापिका कल्पना मळीक, संघाच्या उपाध्यक्षा विभा विठोबा नाईक, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कीर्ती संजय गांवस, उपाध्यक्ष संगेश सुभाष कुंडईकर तसेच समाजसेवक मांगिरीश दुभाषी आणि कु. समृद्धी गणपुले उपस्थित होत्या.
पालक-शिक्षक संघाचा आदर्श प्रयत्न
सरकारी प्राथमिक मराठी शाळा टिकविण्यासाठी आता पालकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. सांखळी विठ्ठलपूर ही शाळा जशी आदर्श शाळा बनली तशीच इतर ठिकाणच्या पालक-शिक्षक संघानेदेखील असाच पुढाकार घेऊन आदर्श शाळा बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच राज्यात मराठी शाळा टिकतील.