महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माणूस नावाचा प्राणी

06:15 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूर्वी मुलांचे शाळेत घालायचे नाव वेगळे आणि घरातले लाडाचे नाव वेगळे असायचे. त्यात प्रामुख्याने काऊ, चिऊ, राघू, मैना, मनी अशी पशुपक्ष्यांची नावे लोकप्रिय होती. सहज म्हणून जरी निरीक्षण केले तर असे लक्षात येते की माणसाच्या आयुष्यात सभोवती असणारी व नसणारी अवघी प्राणीसृष्टी केंद्रस्थानी आहे. माणसापेक्षा त्यांच्याशी नात्यांनी बांधलेले जगणे मध्यवर्ती आहे. बालविश्वात डोकावलो तर कळते की सारे लहानपण हे मानसिकरीत्या पशु-प्राण्यांच्या सान्निध्यातच रुजले आहे. बालकुतूहल आणि निरागसता जपत अवघ्या लोककथांची रुजवण मुद्दामच पूर्वजांनी केली असावी. बडबडे कासव, सिंह आणि उंदीर, खीर खाणारी मांजर, कबूतर आणि मुंगी, माकड आणि मगर अशा मानवेतर प्राण्यांच्या अनेक बोधकथा माणसाने प्राण्यांकडून काय शिकावे व काय शिकू नये हे सांगणाऱ्या आहेत.
Advertisement

नरदेह दुर्लभ आहे. तो वाया घालवू नका हे संतमंडळींनी टाहो फोडून सांगितले. संत नामदेव महाराज म्हणतात, तीसलक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्या। जळचरी भोगाव्या नवलक्ष। अकरालक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या। दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये। तीसलक्ष योनी पशूंचिये घरी। मानवाभीतरी चार लक्ष । एकेका जन्मात कोटी कोटी फेरा घेतल्यानंतर दुर्लभ असा मानवजन्म मिळतो. परंतु आयुष्यात घडते काय? तर नामा म्हणे, ‘तेव्हा नरदेह या नरा । तयाचा मातेरा केला मुढे।।’ माणूसजन्म परमेश्वराच्या भक्तीशिवाय नासून जातो. संसारात रमून माणूस दु:ख भोगतो. संत नामदेव महाराज पुढे म्हणतात, या जन्मातच आत्मारामाला ओळखा कसे? तर ‘संसारी असावे, असून नसावे, कीर्तन करावे वेळोवेळी।।’ नराचा नारायण होणे अर्थात देवपदाला पोहोचणे हे मनुष्याच्या हाती आहे. माणूस हा चौऱ्यांशी लक्ष योनीचा फेरा करून आल्यामुळे त्याच्यात पशुपक्ष्यांचे गुणदोष आहेतच. तेच ओळखून, गुण आत्मसात करून, दोष नाहीसे करून उन्नत जगता यावे म्हणून संतमंडळींचा खटाटोप आहे.

Advertisement

श्री ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये प्राणीसृष्टीचे अनेक दृष्टांत आहेत. त्यात पतंग, काजवा, पूवांतील किडे, गोचीड, माशी, कोशकीटक यासह कासव, मासा, माकड, बेडूक, कुत्रा, उंट, सिंह, मृग, गाय, शेळी, राजहंस, चातक यांसारखे अनेक दाखले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी कीटक, पशुपक्षी, प्राणी यांचे गुणदोष सांगून माणसाला जागे केले आहे. पतंगासारखा किडा तो काय त्यावर माऊली म्हणतात, ‘पतंगा दीपी अलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवी विषयाचरण आत्मघाता’.  पतंग हा किडा दिव्याला जाऊन आलिंगन देतो. अर्थात त्यावर झडप घालतो तेव्हा त्याचा मृत्यू निश्चित असतो. त्याप्रमाणे माणूस दृश्यसुखाच्या मागे लागला की त्याचा घात होतो. माऊली टिटवीचा दृष्टांत देतात. समाजमन टिटवीला अशुभ मानते. मात्र माऊली तिचा गौरव करतात. टिटवीने समुद्राकाठी घातलेली अंडी समुद्राने गिळली तेव्हा तिने ती समुद्राला परत मागितली. समुद्रापुढे टिटवी गौण. समुद्राने दुर्लक्ष करून तुच्छता दर्शवल्याने टिटवी आणि टिटवा या पक्ष्यांनी आपल्या चोचीने समुद्र उपसायला सुरुवात केली तेव्हा नारदांमार्फत त्यांना साक्षात विष्णूचे सहाय्य लाभले आणि समुद्राचे गर्वहरण होऊन टिटवीची अंडी तिला परत मिळाली. एवढा मोठा समुद्र उपसून कोरडा करणे टिटवीला शक्य नव्हते. परंतु तिने प्रयत्न सोडला नाही. ही शिकवण मोठी आहे.

काळाबरोबर शिक्षणाची दिशा बदलली आणि सभोवतीचे प्राणीविश्व देखील गायब झाल्याने भाषेतून त्यांच्याविषयी असलेल्या म्हणी, वाक्प्रचार हद्दपार झाले असले तरी अजून साहित्यामध्ये त्यांचा ठळक वावर आहे. शहरातून आता गाई, म्हशी, बैल यांचा गोठा आढळत नसला तरी म्हणींमधील माणसाचे स्वभाव-विभाव चिरंजीव असल्यामुळे साहेबांच्या सगळ्याच गोष्टींना मान डोलवणारा ‘नंदीबैल’ एखाद्या मोठ्या कार्यालयात भेटतो. गाढव दृष्टीस पडत नसले तरी आजही भाषेतील रोजच्या व्यवहारात ते हमखास भेटते. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ हा अनुभव बुद्धिवंत लोकांना पदोपदी येतो. उंदीर हा उपद्रवी प्राणी. तरी तो चक्क समाजाचा मामा आहे. मांजर मावशी, चिऊताई, खारुताई, बेडूक दादा, गोमाता अशा अनेक नात्यांनी प्राणी माणसांशी जोडून आहेत.

काही काही प्राणी माणसांच्या शरीराशी जोडले आहेत व ते आपले अस्तित्व आजही दाखवतात. बेडकीचा संबंध शरीरातील दंडाशी आणि शक्तीशी आहे. चिमुकली मुंगी हातपाय बधीर करते. क्वचित डोक्यालाही मुंग्या येतात. मुंगीचे पाऊल तर प्रसिद्धच आहे. कावळा हा पक्षी म्हटला तर अस्पर्श, तरीही भूक लागली की माणसाच्या पोटात ‘कावळे’ ओरडतात. एखाद्याचे डोळे घुबडासारखे असतात, तर नजर घारीप्रमाणे असते. सशाचे कान, माकडासारखे चंचल मन, कुत्र्यासारखे तीक्ष्ण नाक, तर सौंदर्य सांगणारी सिंहकटी असते. कोकिळेसारखा कंठ कुणाला दैवाने लाभतो. एखाद्याची चाल राजहंसासारखी डौलदार असते तर कुणी हत्ती सारखे जाड असते. लहान बाळासाठी आईच्या तळहातावर मोर येऊन नाचतो. ‘इथे इथे बस रे मोरा’ म्हणत त्याची ती बाळाशी ओळख करून देते. प्राण्यांशी माणसांचा स्वभावही जोडला आहे. कामाला वाघ, सिंहाचा वाटा, कोह्यासारखा लबाड, रेड्यासारखा सुस्त, सरड्याची धाव, बैलासारखा भारवाहू, गाढवासारखे ओझे वाहणारा, पोपटासारखे बोलणारा, शेळीप्रमाणे चरणारा, चातकासारखा आतुर. एक ना अनेक प्राणीविशेषण माणसाला स्वभावानुसार चिकटतात.

रजनीश ओशोंनी एके ठिकाणी सांगितले की जपानमध्ये असलेल्या प्राणीसंग्रहालयात शेवटच्या टोकाला एक पिंजरा आहे. त्यावर पाटी आहे, ‘द मोस्ट डेंजरस अॅनिमल ऑफ ऑल’ इथे असलेल्या सगळ्या हिंस्त्र पाण्यापेक्षा कोण बरे हा महाभयंकर प्राणी? तर तो पिंजरा रिकामा असून तिथे फक्त एक आरसा आहे. त्यात माणसाला स्वत:चे प्रतिबिंब दिसते. माणूस हा कुठल्याही पातळीवर जाऊ शकतो. तसा तो जाऊ नये, त्याच्यात दिव्यत्वापर्यंत जाण्याची क्षमता आहे. म्हणून संतांची प्रबोधनात्मक धडपड आहे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article