विशाल परबांच्या माध्यमातून माडखोल आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका प्रदान
वाढदिवसाचे औचित्य
ओटवणे । प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांचा आज १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असून विशाल परब यांच्या मार्फत माडखोल आरोग्य उपकेंद्राला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली . दरवर्षी श्री परब यांच्या वाढदिवसाचा सप्ताह हा विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीने ,जनसागराच्या प्रचंड उपस्थितीत साजरा होतो. यावर्षी मात्र उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करता, रतन टाटांना अभिप्रेत असे विविध जनहितकारी उपक्रम या दिवशी घेतले जातील, असा निर्णय विशाल परब यांनी जाहीर केला होता. आपल्या वाढदिवसाला बॅनर किंवा वर्तमानपत्रातून शुभेच्छा देऊ नयेत, पुष्पगुच्छ अथवा केक आणू नयेत असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.
आपल्या दानशूरपणातून अनेकांना सतत मदतीला धावणारे युवा नेतृत्व श्री विशाल परब यांची तरुणाईत मोठी क्रेझ आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा छोट्या छोट्या बच्चेकंपनीत प्रचंड फॅन फॉलोअर आहे. दिला शब्द पुरा करणारा युवा नेता अशी त्यांची ओळख असल्याने ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, युवा वर्ग आणि तमाम मायमाऊलींमध्ये त्यांच्याबद्दल "आमचो भाव... आमचो झील" अशी एक वेगळीच आपुलकी असलेली दिसून येते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त माडखोल प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली.
श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून मागील अनेक वर्षे सातत्यपूर्वक केले जाणारे कित्येक कार्यक्रम, त्यांच्या दानशूरपणातून अनेक लोकांना झालेली मदत, गोरगरिबांची कोसळलेली घरे बांधून देण्यासाठी त्यांनी घेतलेली धाव, अनेकांच्या गंभीर आजारपणात पुढे केलेला मदतीचा हात यामुळे या युवा नेतृत्वाने एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्यातूनच आज वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेऊनही हजारो नागरिकांनी त्यांची भेट घेऊन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमांच्या कार्यक्रम स्थळी प्रचंड गर्दी करत युवा वर्ग, मायमाऊली, ज्येष्ठ नागरिक त्यांना शुभेच्छा देत असल्याचे चित्र समोर येत आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, विशाल परत यांच्यासारखा कर्तृत्ववान युवा चेहरा यंदा परिवर्तन घडवू शकतो अशी चर्चाही लोकांमधून होत आहे.