संगमेश्वर-शेंबवणेत सिलिंडर लिकेज होऊन प्रौढाचा होरपळून मृत्यू
संगमेश्वर वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलिंडर गळतीने भाजलेल्या एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. बाळू सोमा बांबाडे (55, गोमानेवाडी, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. या घटनेने ऐन गणेशोत्सवात बांबाडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सविसर वृत्त असे की, शेंबवणे गोमानेवाडी येथील बाळू बांबाडे हे सकाळी 8.30 वाजता घरात गणेशमूर्तीची पूजा-अर्चा करत होते. यावेळी त्यांच्या पत्नीने सारवण करताना गॅस सिलिंडर बाजूला करण्यास सांगितले. यावेळी गॅस सिलिंडर लिकेज झाला. यावेळी अचानक सिलिंडरचा भडका उडून बाळू बांबाडे हे गंभीर जखमी झाले. त्यात ते 90 टक्के भाजले. या घटनेची माहिती आजूबाजूला कळताच त्यांना ग्रामस्थांनी लगेच संगमेश्वर ग्रामीण ऊग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची स्थिती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय ऊग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवात दुर्दैवी दुर्घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.