अमूर ससाण्याचा 13 दिवसात 7,300 किलोमीटरचा प्रवास
सॅटेलाईट टॅग लावल्यामुळे प्रवासमार्गाची नोंद : जिह्यातील कडेगावजवळ घेतला विसावा
कडेगाव :
मणिपूरमधून उडालेला सॅटेलाईट टॅग लावलेला अमूर ससाणा पक्षी सांगलीत थांबला आणि गुहागरमधील गोपाळगडावरून अरबी समुद्रात प्रवेश करून त्याने केनियापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. 13 ते 27 नोव्हेंबर या 13 दिवसांच्या कालावधीत या पक्ष्याने 7,300 किलोमीटरचा अद्भुत प्रवास केला.
दरवर्षी उत्तर चीनमध्ये प्रजनन करणारे हे पक्षी हिवाळ्यात आफ्रिकेकडे जातात. या प्रवासाच्या दरम्यान, ते भारतातील नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये थांबून विश्रांती घेतात. भारतीय वन्यजीव संस्थानाचे (डब्ल्यूआयआय) शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेशकुमार यांनी या पक्ष्यांना सॅटेलाईट टॅग लावले.
हा पक्षी 14 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधून उडाल्यानंतर, हा पक्षी ओरिसातील किनारी प्रदेश, तेलंगणा, आणि 16 नोव्हेंबर रोजी सांगलीत पोहोचला. सांगलीतील कडेगावजवळ त्याने रात्रभर विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी गुहागर, गोपाळगड आणि अरबी समुद्रातून त्याने केनियाची दिशा पकडली. एप्रिल आणि मे महिन्यात, हा पक्षी आफ्रिकेतून परतीचा प्रवास सुरू करेल.
कडेगाव येथे मुक्कामाची नोंद
मी दोन अमूर ससाणा (फालको अमूरॅनसिस) पक्षांना सॅटेलाईट टॅग लावले होते. टॅग लावलेला एक पक्षी कडेगाव शहराजवळच्या माळरानांवर मुक्कामी थांबल्याची नोंद आहे. हा ससाणा हिवाळ्यात दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित होतो व स्थलांतरा दरम्यान तो भारत, श्रीलंका, चीन आदी आशियाई देशावरून प्रवास करतो. त्यामुळे मार्गस्थ असताना काही ठिकाणी विसावा घेतो. तोच विसावा त्यांने 16 नोव्हेंबर रोजी कडेगाव जवळ घेतला. दुस्रया पक्ष्याने त्याच प्रदेशातुन कोल्हापूरकडून स्वतंत्रपणे प्रवास केल्याची नोंद आहे. असे भारतीय वन्यजीव संस्थाचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेशकुमार यांनी सांगितले.
नर पक्षाचे चिऊलुआन-2 आणि मादीचे गुआनग्राम अशी नावे
टॅग लावलेल्या नर ससाण्याचे नाव ’चिऊलुआन-2’ आणि मादीचे नाव ’गुआनग्राम’ ठेवण्यात आले. स्थानिक गावांच्या नावावरून ही नावे ठेवण्यात आली आहेत. यातील नर पक्ष्यांने कडेगाव मार्गे प्रवास केल्याची नोंद आहे, असे शास्त्रज्ञ आर सुरेशकुमार यांनी सांगितले.