For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जामनेरमध्ये अमृता पुजारी, विजय चौधरीचे वर्चस्व

06:37 AM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
जामनेरमध्ये अमृता पुजारी  विजय चौधरीचे वर्चस्व
Advertisement

देवाभाऊ केसरीत उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर : आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच भारी

Advertisement

प्रतिनिधी/ जळगाव

कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ 2 अंतर्गत आयोजित देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पैलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.

Advertisement

देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना पराभूत करत कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे कुस्तीत महिलांना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि शेवटची कुस्ती महिलांची लावण्यात आली.

शिरोळच्या अमृता पुजारीचा दणकेबाज विजय

महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटालिना क्सेन्टने हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय नोंदविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृताने उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईने गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

विजय चौधरी, सिकंदर शेखचा सहज विजय

जामनेर नगरीत झालेल्या या दंगलीत विजय चौधरीने दबदबा दाखवताना आशियाई विजेता उझबेकिस्तानच्या सुक्सरोब जॉनला केवळ दोन मिनिटांत चीतपट करत प्रेक्षकांची मने जिंकली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडीने प्रान्सच्या वर्ल्ड चॅम्पियन अंजलीक गोन्झालेझ हिच्यावर सहज विजय मिळवला. तिच्या अचूक चालींमुळे तिने विरोधकाला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. तसेच, महाराष्ट्र केसरी विजेती सोनाली मंडलिक हिने एस्टोनियाच्या मार्टा पाजूला हिला पराभूत करून प्रथम गुण घेत प्रभावी विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने युरोपियन चॅम्पियन मोल्दोवाच्या घेओघे एरहाणला चितपट करत आपली ताकद सिद्ध केली.

तसेच, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने जॉर्जियाच्या वर्ल्ड चॅम्पियन इमामुकवर विजय मिळवत भारतीय कुस्तीतील स्वत:चे स्थान भक्कम केले. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने रोमानियाच्या युरोपियन चॅम्पियन फ्लोरिन ट्रिपोन याला पराभूत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने वर्ल्ड चॅम्पियन गुलहिर्मो लिमाला सहज चितपट केले. त्याच्या कुस्तीतील सफाईदार खेळाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. महाराष्ट्राचा राष्ट्रीय विजेता शिवा चव्हाण आणि हरियाणाच्या त्रिमूर्ती केसरी रजत मंडोथी यांची कुस्ती अत्यंत चुरशीची ठरली आणि अखेरीस बरोबरीत सोडवण्यात आली. महाराष्ट्राचा भवानी केसरी वेताळ शेळकेने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विजेता जॉन्टी गुज्जरचा पराभव करून प्रेक्षणीय विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने इराणच्या एशिया मेडालिस्ट जलाल म्हजोयूबला चितपट करत जबरदस्त कौशल्य दाखवले.

या सर्व कुस्त्यासाठी पंच आणि संयोजक म्हणून हिंदकेसरी रोहित पटेल यांनी काम पाहिले. शेवटच्या 3 कुस्त्यासाठी पंच म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी काम पाहिले. 9 देशांच्या या स्पर्धेत भारत, प्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे खेळाडू सहभागी झाले होते. राजू आवळे,  कोल्हापूर यांच्या हलगीच्या आवाजने मैदान दुमदुमले होते.

कुस्तीत महाराष्ट्राचा दबदबा - मुख्यमंत्री

‘जागतिक पटलावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे,‘ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. त्यांनी ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ व एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. ‘मागील काही काळात मॅटवरील कुस्तीला अधिक प्राधान्य मिळाले होते, मात्र आता मातीवरील कुस्तीने दमदार पुनरागमन केले आहे. कुस्तीच्या माध्यमातून भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव होते. आज विजय चौधरी, सोनाली मंडलिक यांसारखे खेळाडू परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आहेत,‘ असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.