शेतकऱ्याच्या खात्यातील ऊसबिलाची रक्कम हडप
अतिवाडच्या शेतकऱ्याला सायबर गुन्हेगारांचा 31 हजारांचा गंडा : आधार एनेबल सिस्टीमचा वापर
बेळगाव : आधार एनेबल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून अतिवाड (ता. बेळगाव) येथील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून 31 हजार 200 रुपये हडप करण्यात आले आहेत. यासंबंधी शहर सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे. अतिवाड येथील आनंद यल्लाप्पा पाटील यांनी फिर्याद दिली आहे. आनंद यांनी साखर कारखान्याला ऊस पाठवला होता. 4 जानेवारी रोजी उसाचे बिल जमा झाले आहे का? हे पाहण्यासाठी आधार एनेबल पेमेंट सिस्टीमचा त्यांनी वापर केला. मात्र, त्यादिवशी रक्कम जमा झाली नव्हती. 10 जानेवारी रोजी बिल जमा झाले. त्यानंतर दोन दिवसात बॅलन्स चेक करण्यासाठी ते बँकेत पोहोचले.
त्यावेळीही त्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम होती. 12 जानेवारी, 14 जानेवारी असे एकूण 31 हजार 200 रुपये त्यांच्या बँक खात्यातून काढण्यात आले आहेत. आधार एनेबल पेमेंट सिस्टीमचा वापर करून रक्कम काढण्यात आली असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षातील फसवणुकीचे प्रकार लक्षात घेऊन पोलीस दलाने सुरक्षिततेसाठी नागरिकांना आपले बायोमेट्रिक फिंगरप्रिंट लॉक करण्याचे आवाहन केले होते. फिंगरप्रिंट क्लोन करून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे हडप करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट लॉक करण्याचा एकच मार्ग आहे.