महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गरिबांचा अमिताभ

06:15 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ख्यातनाम अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणे, ही वार्ता मिथुनदांच्या चाहत्यांसह सर्वच चित्रपटरसिकांसाठी आनंददायी म्हणता येईल. भारतीय सिनेसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कारास अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आजवर अनेक महान व गुणवंत कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या नामावलीत आता मिथुनचाही समावेश झाल्याने बी ग्रेड म्हणून हिणवल्या गेलेल्या या कलाकाराला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याचे दिसून येते. प्रत्येक कलाकार व त्याची शैली वेगळी असते. त्याच्यातील अंगभूत गुण, त्याला मिळणाऱ्या भूमिका यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. किंबहुना, कधी कधी काठोकाठ गुणवत्ता असूनही, काही कलाकार हे साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकून पडतात. मिथुनबद्दलही थोड्या फार फरकाने असेच म्हणता येईल. परिस्थितीचे चटके सोसत मायानगरीची वाट धरणाऱ्या मिथुनदाला प्रारंभीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला. पोट भरण्यासाठी आपल्याला कशी वणवण करावी लागली, उघड्यावर कुठेही कसे झोपावे लागले आणि सिनेमापर्यंत जाण्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या, या कटू आठवणी वयाच्या पंच्याहत्तरीतही हा कलाकार विसरलेला नाही. यांसह अन्य अनेक उदाहरणांतून त्याच्यातील ‘डाऊन टू अर्थ’ असणेच अधोरेखित होते. मिथुनने आपली चित्रपट कारकीर्द मृणाल सेन यांच्या ‘मृगया’ या चित्रपटापासून सुरू केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अॅवॉर्ड प्राप्त होणे, यातूनच त्यांच्या अभिनयाचा दर्जा स्पष्ट होतो. ‘डिस्को डान्सर’ हा तर मिथुनच्या कारकिर्दीतील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरावा. या चित्रपटाने 1980 मध्ये सिनेजगतात तुफान निर्माण केले. त्या काळात या सिनेमाने तब्बल 100 कोटी रुपयांचा गल्ला जमविल्याचे सांगण्यात येते. हे लक्ष्य सर्वप्रथम प्राप्त करणाऱ्या या चित्रपटाने मिथुनला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. मिथुन त्या काळात वस्त्यावस्त्यांवर इतका लोकप्रिय झाला, की विचारता सोय नाही. अनेक चित्रपटांची रांग त्याच्याकडे लागली, ती या चित्रपटातूनच. त्यानंतरच्या एका वर्षांत सर्वात जास्त चित्रपट प्रदर्शित झाले, ते मिथुनचेच. खरे तर या काळात महानायक अमिताभ बच्चनची कारकीर्द ऐन बहरात होती. अमिताभने एखादा चित्रपट करावा आणि त्याचे सोने व्हावे, हा जणू पायंडाच पडला होता. या काळात जितेंद्र, धर्मेद्र वा तत्सम नायकही आपापला चाहतावर्ग राखून होते. यादरम्यान मिथुनने आपला स्वतंत्र वर्ग निर्माण करण्याची किमया केली. मिथुनचे चित्रपट हे बऱ्याचदा कमी बजेटचे असायचे. गरिबीतून आलेला नायक त्याने प्रामुख्याने रंगविला. सामान्यातला सामान्य होऊन अभिनय करण्याच्या कौशल्यामुळे मिथुन तळातील वर्गाला आपलासा वाटू लागला. त्यामुळे वस्त्या, चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये जणू मिथुन क्लबच स्थापन झाले. मिथुनचा चित्रपट आला, की ही सगळी गँग थिएटरमध्ये हजर असायची. त्यातूनच गरिबांचा अमिताभ ही उपाधी त्याला मिळाली. तीच त्याची खरी ओळख बनली. डान्स डान्स, कसम पैदा करने वाले की, असे अनेक चित्रपट मिथुनमधील अभिनयक्षमता व नृत्यनैपुण्याचे दर्शन घडवतात. मिथुनचा डान्स पाहणे, हाही त्याकाळी एक अवर्णनीय अनुभव असायचा. पायाला स्प्रिंग लावल्यासारखा मिथुन नाचतो ते डान्समुळे. काही असले, तरी त्याचे ते उत्स्फूर्त नाचणे व आवाज काढणे, यातून रसिकांना ऊर्जा मिळत असे. रोमँटिक हिरो म्हणूनही मिथुनने काही चांगले चित्रपट केले. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसोबतचे त्याचे चित्रपट विशेष गाजले. प्यार झुकता नही या चित्रपटातील त्याची भूमिका अप्रतिमच म्हटली पाहिजे. प्यार का मंदिर, वारदात, हमसे है जमाना, हमसे बढकर कौन हे त्याचे आणखी काही चांगले चित्रपट. अग्निपथ हा मिथुनचा तसा अलीकडच्या काळातील सिनेमा. यातील अमिताभचा अभिनय, आवाज यावर जेवढ्या चर्चा झाल्या, तेवढेच मिथुनच्या अभिनयाबद्दलही बोलले गेले. त्याने रंगविलेला नारळपाणीवाला कोण विसरेल? मिथुनची यातली भूमिका चाहत्यांना न विसरता येण्यासारखी. त्यामुळे सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार या चित्रपटात त्याने पटकावला. स्वामी विवेकानंद व ताहेदार कथा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटांसाठीही त्याला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला, यातच सर्व आले. मुख्य म्हणजे मिथुनला जमिनीवरील प्रश्नांची जाण होती. त्याच्या काही चित्रपटांतून त्याची ही दृष्टी दिसून येते. असे असले, तरी अभिनय क्षमतेचा विचार करता मिथुनला आणखी चांगले चित्रपट मिळायला हवे होते, असे वाटते. या ना त्या माध्यमातून तो एका चौकटीत अडकत गेला. अन्यथा, वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याची ताकदही या कलाकारामध्ये होती, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. मिथुनला फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत. धर्मेंद्र, जितेंद्र, हेमा मालिनी वा अन्य कलाकारांना अद्याप हा पुरस्कार मिळालेला नसताना या पुरस्कारासाठी त्याची निवड झाल्याबद्दल काहीसे आश्चर्यही व्यक्त होताना दिसते. जितेंद्र, धर्मेद्र, हेमा किंवा अन्य कलाकार असतील. त्यांच्या अभिनयक्षमतेबद्दल दुमत असण्याचे नक्कीच कारण नाही. तेही नक्कीच या पुरस्कारासाठी पात्र ठरतात. पण, म्हणून मिथुन या पुरस्कारास पात्र नाही, असा अर्थ घेणे, हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे ठरते. प्रत्येक कलाकाराचा एक काळ असतो. मिथुननेही एक काळ गाजवत झोपडीतल्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण केला. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवल्याबद्दल गरिबांच्या या अमिताभचे हार्दिक अभिनंदन.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article