अमिताभ कांत अतिरिक्त संचालक म्हणून इंडिगोत रुजू
नवी दिल्ली : माजी जी-20 शेर्पा अमिताभ कांत हे आता अधिकृतरित्या इंडिगोमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून मंडळामध्ये रुजू झाले आहेत. हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगोने ही माहिती शेअरबाजाराला दिली आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. गेल्या 3 जुलै रोजी हवाई क्षेत्रातील कंपनीने अमिताभ कांत यांची मंडळावर निवड केली असल्याचे म्हटले होते. 15 सप्टेंबर 2025 पासून त्यांनी अतिरिक्त संचालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान इंडिगो शिवाय एचसीएल टेक यांनीही कांत यांना आपल्या संचालक मंडळात सामील करुन घेतले आहे. मागच्या आठवड्यात एचसीएल टेकने पाच वर्षांच्या कालावधीसाठी कांत यांना बिगर कार्यकारी संचालक म्हणून नेमण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या कारकिर्दीला 8 सप्टेंबर 2025 पासून सुरूवात झालेली आहे, असेही सांगितले जाते.