2,258 दिवसांपासून गृहमंत्री आहेत अमित शाह
सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा विक्रम : लालकृष्ण अडवाणी यांना टाकले मागे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमित शाह हे मंगळवारी भारताचे सर्वाधिक काळापर्यंत केंद्रीय गृहमंत्रिपद भूषविणारे नेते ठरले आहेत. शाह हे 2,258 दिवसांपासून गृहमंत्री आहेत. शाह यांनी 30 मे 2019 रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात गृहमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.
शाह यांनी गृहमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ 9 जून 2024 रोजी पूर्ण केला होता. 10 जून 2024 रोजी ते पुन्हा गृहमंत्री झाले आणि तेव्हापासून या पदावर आहेत. गृह मंत्रालयासोबत देशाचे पहिले सहकार मंत्री देखील म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी शाह हे भाजपचे अध्यक्ष आणि गुजरातचे गृहमंत्री राहिले आहेत. शाह यांनी गृहमंत्री म्हणून भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याची तरतूद असलेले विधेयक त्यांनीच संसदेत मांडले होते.
गृहमंत्री म्हणून शाह यांनी भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विक्रम मोडला आहे. अडवाणी हे 19 मार्च 1998 पासून 22 मे 2004 पर्यंत एकूण 2,256 दिवसांपर्यंत केंद्रीय गृहमंत्री होते. अडवाणी यांच्यानंतर काँग्रेस नेते गोविंद वल्लभ पंत हे सर्वाधिक काळापर्यंत गृहमंत्री राहणारे तिसरे नेते होते. गोविंद वल्लभ पंत यांनी 10 जानेवारी 1955 ते 7 मार्च 1961 पर्यंत 6 वर्षे आणि 56 दिवसांपर्यंत केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम
यापूर्वी नरेंद्र मोदींनी 25 जुलै रोजी पंतप्रधानपद सर्वाधिक काळ भूषविण्याप्रकरणी दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले होते. मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 4,077 दिवसांच्या (24 जानेवारी 1966 पासून 24 मार्च 1977) कालावधीचा विक्रम मोडला होता. पंतप्रधान मोदींनी 25 जुलै रोजी पंतप्रधान पदावरील 4,078 दिवस पूर्ण केले होते. सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. ते 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत म्हणजेच सलग एकूण 6,126 दिवसांपर्यंत या पदावर होते. परंतु पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्याप्रकरणी नेहरूंशी बरोबरी केली आहे.