अमित शहांना इतिहास माहीत नाही : राहुल गांधीं
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून अमित नेहमी टीका करताना दिसतात. आज त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. 'पंडित नेहरू यांनी देशासाठी आयुष्य वेचलंय. अमित शहांना इतिहास माहीत नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही करता येत नाही, असा टोला राहुल यांनी लगावला आहे.
आजचा काश्मीर प्रश्न पंडित नेहरूंच्या चुकांमुळं निर्माण झाला आहे, असं अमित शाह सोमवारी राज्यसभेत म्हणाले होते. याबाबत आज संसदेच्या आवारात पत्रकारांनी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ‘पंडित नेहरूंनी देशासाठी मोठा त्याग केला आहे. ते अनेक वर्षे तुरुंगात होते. अमित शहा यांना इतिहासाची माहिती नाही. त्यांना इतिहास माहीत असण्याची अपेक्षाही करता येत नाही. त्यांना केवळ इतिहासाचा विपर्यास करण्याची आणि पुनर्लेखन करण्याची सवय आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
'नेहरूंवर टीका करणं हा मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. मूळ मुद्दा हा जातनिहाय जनगणना आणि विविध समाजघटकांचा व्यवस्थेतील सहभाग हा आहे. देशाचा पैसा कोणाच्या खिशात जात आहे हा आहे. भाजपला या विषयावर चर्चा करायची नाही. ते घाबरतात आणि यापासून पळून जातात. मात्र, काँग्रेस हा मुद्दा उचलत राहील आणि गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देईल, असं राहुल गांधी म्हणाले.