For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमित पांघल, सचिन उपांत्य फेरीत

06:22 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमित पांघल  सचिन उपांत्य फेरीत
Advertisement

स्ट्रँडजा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धा : रजतही शेवटच्या चारमध्ये, ललित मात्र स्पर्धेबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ सोफिया, बल्गेरिया

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णविजेता अमित पांघल व राष्ट्रीय चॅम्पियन सचिन यांनी येथे सुरू असलेल्या 75 व्या स्टँडजा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत आपापल्या वजन गटातून उपांत्य फेरी गाठली.

Advertisement

51 किलो वजन गटात अमितने उत्तम फॉर्म कायम राखत मंगोलियाच्या अल्दारखिशिग बटुल्गावर 5-0 अशी एकतर्फी मात केली. आधीच्या फेरीत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखत विजय मिळविल्यानंतर अमित या लढतीतही घातक वाटत होता. प्रारंभापासूनच्या त्याने लढतीवर नियंत्रण मिळवित बटुल्गाला परतण्याची संधीच दिली नाही. एका क्षणासाठीही त्याने आपली पकड सैल होऊ दिली नाही. त्याने प्रत्येक राऊंड जिंकत ही लढत एकतर्फी जिंकली.

57 किलो वजन गटाच्या लढतीत सचिननेही जॉर्जियाच्या कॅपानेझ जॉर्जीवर पूर्ण वर्चस्व राखत विजय मिळविला. लय मिळविण्यास त्याने थोडा वेळ घेतला, पण एकदा लय सापडल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने पहिला राऊंड 4-1 असा जिंकला आणि प्रतिआक्रमण करीत दुसरा राऊंडही जिंकला. तिसऱ्या राऊंडमध्ये जॉर्जीने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण सचिनने ही लढत 5-0 अशी सहज जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याची उपांत्य लढत युक्रेनच्या अब्दुरैमोव्ह ऐदरशी होईल.

आधीच्या फेरीत बाय मिळाला असल्याने स्पर्धेतील पहिली लढत खेळणाऱ्या रजतने 67 किलो वजन गटात वेळ न दवडता आक्रमण सुरू केले आणि प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदत त्याचा तोल बिघडवून टाकला. त्यामुळे रेफरीनी लढत थांबवली रजतला नॉकआऊट विजयी घोषित केले. उपांत्य फेरीत त्याची लढत जॉर्जियाच्या गुरुली लाशाशी होईल. 54 किलो गटाच्या लढतीत ललितला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. उझ्बेकच्या नॉर्टोजिएव्ह खुजानझरने त्याला 5-0 अशा गुणांनी पराभूत केले. त्याआधी नवीन कुमारने 92 किलो गटाच्या उपांत्य लढतीत कझाकच्या अफझलवर 4-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली होती.

Advertisement
Tags :

.